सांगली : मिरजेतील भिकू उर्फ सुधीर कांबळे या तरुणाचा खून केल्याचा आरोप असलेला मिरजेतील डॉ. महेश महादेव कांबळे (वय ३८, रा. म्हैसाळ वेस, मिरज) हा गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. रामटेके यांच्या न्यायालयात शरण आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. गतवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीनंतर महेश कांबळे याचा भाऊ व मृत भिकू कांबळे यांच्यात वादावादी झाली होती. या प्रकारानंतर २९ एप्रिल २०१६ रोजी भिकू व त्याचा मित्र वड्डीहून दुचाकीवरुन मिरजेत येत होते. त्यावेळी कांबळे व त्याच्या १८ साथीदारांनी दुचाकीला धक्का मारुन त्यांना खाली पाडले. भिकूला शिवीगळ करुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. त्याच्या मित्राने आरडाओरड केल्यानंतर कांबळे व त्याचे साथीदार पळून गेले होते. मारहाणीत भिकू गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले होते. पण उपचार सुरु असताना तिसऱ्यादिवशी त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कांबळेसह १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. १८ संशयितांना अटक करण्यात आली होती. यातील दोन संशयित अल्पवयीन होते. कांबळे हा अटकेच्याभितीने फरारी झाला होता. या काळात त्याने जिल्हा न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिन घेण्याचा प्रयत्न केला. पण तिनही न्यायालयात त्याचा जामीन फेटाळला होता. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात त्याला जिल्हा न्यायालयात शरण येऊन म्हणणे मांडण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार गुरुवारी सकाळी अकरा वाजता कांबळे जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. रामटेके यांच्या न्यायालयात शरण आला. पोलिस कोठडीकांबळे शरण आल्याचे समजताच मिरज पोलिसांचे पथक तातडीने सांगलीत दाखल झाले. त्यानंतर त्याला अटक केली. दुपारी मिरजेतील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात त्याला उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला २२ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
मिरजेतील महेश कांबळेला अटक
By admin | Published: March 16, 2017 7:03 PM