लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनात सहभागी असलेल्या संघटना आणि सर्व सूत्रधारांना अटक करून त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी. या खुन्याच्या तपासात होणाऱ्या अक्षम्य दिरंगाईबाबत अंनिसच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. तपास प्रक्रिया गतिमान पद्धतीने होण्यासाठी राज्य सरकारने पंतप्रधानाकडे आग्रह धरावा, अशी मागणी महाअंनिसच्या वतीने करण्यात आली.
येथील नायब तहसीलदार सीमा सोनवणे यांना अंनिसचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे, शाखा कार्याध्यक्ष प्रा. बी. आर. जाधव, मोहन जाधव, विनोद मोहिते, जितेंद्र भिलवडीकर यांनी निवेदन दिले. या निवेदनात डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. प्रा. एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश हे चारही खून एकमेकांत गुंतलेले आहेत. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणांचा सुसंवाद होऊन संयुक्त कारवाई करणे आवश्यक आहे. या सर्व खुनांचा तपास गतीने होण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात यावे. त्यासाठी शासनाने निष्णात कायदेतज्ज्ञांची नियुक्ती करावी. धार्मिक मूलतत्त्ववादी व्यक्ती आणि संघटनांवर बंदी आणावी. सामाजिक कार्यात सहभागी असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी कडक कायदा करावा, असे म्हटले आहे.
अंनिसचे संस्थापक डॉ. दाभोलकर यांचा खून २० ऑगस्ट २०१३ मध्ये झाला. या घटनेला आठ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानंतर समाज प्रबोधनासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या करण्यात आली. पुरोगामी महाराष्ट्रात पुरोगामी विचारवंतांचे खून पडतात, हे भूषणावह नाही.
यावेळी डॉ. नितीन शिंदे, डॉ. प्रमोद गंगनमाले, योगेश कुदळे, प्रशांत इंगळे, समृद्धी भिलवडीकर, वनिता बनसोडे उपस्थित होत्या.