सांगली : महापालिका क्षेत्रातील नवीन इमारतीची घरपट्टी कमी करण्यासाठी साडेचार हजारांची लाच घेताना महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागातील शिपाई बापू महादेव हुबाले (वय ४६, रा. रेव्हेन्यू कॉलनी, चांदणी चौक, सांगली) यास रंगेहात पकडण्यात आले. चांदणी चौकातील एका हॉटेलमध्ये आज, मंगळवारी सकाळी नऊ वाजता ही कारवाई करण्यात आली.सांगलीतील फिर्यादीने नुकतेच नवीन घर बांधले आहे. या घराला नव्याने घरपट्टीची आकारणी केली जाणार आहे. घरपट्टीचे निर्धारण करण्याचे काम महापालिकेकडून केले जाते. त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. संशयित बापू हुबाले घरपट्टी विभागात शिपाई म्हणून नियुक्तीस आहे. घराचे निर्धारण कमी करून देण्यासाठी हुबाले फिर्यादीला भेटला होता. त्यावेळी हुबालेने त्यांच्याकडे साडेआठ हजार रुपये लाच मागितली होती. शेवटी चर्चेअंती साडेचार हजार रुपये देण्याचे ठरले होते. या प्रकारानंतर फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. या विभागाने लावलेल्या सापळ्यानुसार फिर्यादीने आज, मंगळवारी सकाळी लाच देण्याचे मान्य केले होते. त्याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला उद्या (बुधवार) न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
शिपायास लाच घेताना अटक
By admin | Published: October 01, 2014 1:05 AM