जत : वारसा नोंद घालण्यासाठी सात हजार रुपयांची मागणी करून त्यातील पाच हजार रुपये रोख स्वीकारताना लाचलुचपत विभागाने बेळुंखी (ता. जत) येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई आज (सोमवार) दुपारी ३.३० च्या दरम्यान जत तहसील कार्यालय परिसरात करण्यात आली. याप्रकरणी तलाठ्याविरोधात जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.आर. डी. कांबळे (वय ५५, रा. माजी सैनिक वसाहत, मिरज) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. कांबळे याच्याकडे बाज व बेळुंखी या दोन गावांचा कार्यभार आहे. बेळुंखी येथील बाबासाहेब रावू चंदनशिवे यांची वारसा नोंद करण्यासाठी कांबळे याने सात हजार रूपयांची लाच मागितली होती. त्यापैकी पाच हजार रुपये घेऊन ते आज तहसील कार्यालय परिसरात आले होते. कांबळे पैसे स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडून कारवाई केली. या घटनेमुळे जत तहसील कार्यालय परिसरात काहीवेळ खळबळ माजली होती. कांबळे याच्याविरोधात यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी त्याला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर तत्कालीन तहसीलदार आनंदराव तांदळे यांची बनावट सही करून ग्रामीण भागातील नागरिकांना रेशन कार्ड वाटप केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले होते. कालांतराने ते परत सेवेत दाखल झाले होते. आज परत त्यांच्याविरोधात तिसऱ्यांदा कारवाई झाली आहे. तरीही ते हसतमुख चेहऱ्याने जत पोलीस ठाण्यात बसून होते.या कारवाईत पोलीस उपअधीक्षक प्रदीप आफळे, निरीक्षक दत्तात्रय सुरवसे, हरिदास जाधव, पोलीस कर्मचारी चंद्रकांत गायकवाड, सचिन कुंभार, सुनील कदम, सुनील राऊत, दीपक धुमाळे यांनी भाग घेतला होता. (वार्ताहर)
लाच घेताना बेळुंखीच्या तलाठ्याला अटक
By admin | Published: July 15, 2014 12:54 AM