सांगली : शहरासह कोल्हापूर येथील शिवाजीनगर आणि जयसिंगपूर येथून मोटार आणि दुचाकी चोरून त्याचे सुटे भाग भंगारात विकणाऱ्या सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. नागेश हणमंत शिंदे (वय २८ रा. कोरोची, इचलकरंजी) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून अडीच लाख रुपये किंमतीचे सुटे भाग जप्त करण्यात आले आहेत.जिल्ह्यात वाढलेल्या दुचाकी, मोटारी चोरीच्या तपासासाठी एलसीबीच्यावतीने खास पथक तयार करण्यात आले आहे. पथक गस्तीवर असताना, त्यांना माहिती मिळाली की, संशयित शिंदे याने सांगलीसह विविध परिसरातून गाड्या चोरून त्या मोडून तोडून भंगारात घालत असून त्याचे सुटे भाग तो विक्री करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने शिंदे याच्या इचलकरंजी येथील घरी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले.
तेथे त्याच्या घराबाहेर असणाऱ्या दोन दुचाकींबाबत तो माहिती देवू शकला नाही. अधिक चौकशीत त्याच्या जवळ १४ हजार रुपये मिळून आले. घरासमोर मोटार आणि दुचाकीच्या पडलेल्या साहित्याबाबत त्याने सांगितले की, सांगलीतील पटेल चौक आणि गावभाग येथील विष्णूघाट परिसरातून मोटार चोरून गाडीचे आणि इंजिनचे सर्व भाग सुटे करून विकल्याचे त्याने सांगितले. त्याच्या घरासमोर लावलेल्या दोन दुचाकी या कोल्हापूर शहरातील शिवाजीनगर तसेच जयसिंगपूर येथून चोरल्याचे त्याने सांगितले. यावेळी त्याच्याकडून २ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, अमर नरळे, मछिंद्र बर्डे, अनिल कोळेकर, संदीप नलवडे, सागर टिंगरे यांच्या पथकाने केली.