लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : तपासणी न करताच कोरोनाचा बनावट निगेटिव्ह अहवाल देणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. स्वप्निल सुरेश बनसोडे (वय २५, रा. ढवळी, ता. मिरज) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून दोन बोगस अहवाल जप्त करण्यात आले असून, तो मिरजेतील खासगी रुग्णालयात कामास आहे.
कोरोनामुळे अगोदरच ताण असताना, असा गैरप्रकार करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली.
शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाअंतर्गत प्रवासासाठी आता ‘ई-पास’ आवश्यक केला आहे. हा पास नसल्यास इतर जिल्ह्यात प्रवेश दिला जात नाही. या पाससाठी कोरोना तपासणी अहवाल आवश्यक असतो. मात्र कोणतीही तपासणी न करता बनावट अहवाल देण्यात आल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. मिरज येथील रुग्णालयात संशयित स्वप्निलकडे बोगस ग्राहक पाठविण्यात आले. यावेळी त्याने घशातील स्रावाचे नमुने न घेता निगेटिव्ह अहवालासाठी एक हजार रुपये लागतील, असे सांगितले होते. त्यानंतर ग्राहकाला बोगस अहवाल देताना एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले.
अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड, उपनिरीक्षक अभिजीत सावंत, दिलीप ढेरे, जितेंद्र जाधव, सुधीर गोरे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
चौकट
गैरप्रकार खपवून घेणार नाही
गेल्याच आठवड्यात रेमडेसिविरचा काळाबाजार एलसीबीने उघडकीस आणला होता. कोरोनास्थिती अधिकच गंभीर बनत असताना आता बोगस तपासणी अहवाल देण्याचा प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील कर्मचारीच यात सहभागी असल्याने गांभीर्य आणखी वाढले आहे. दरम्यान, असा कोणताही गैरप्रकार खपवून घेणार नाही असा इशारा पोलीस अधीक्षक गेडाम यांनी दिला आहे.