लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शेअर मार्केटच्या माध्यमातून जादा परताव्याचे आमिष दाखवून ९२ लाखांची फसवणूक करणाऱ्या एस एम ग्लोबलचा सर्वेसर्वा मिलिंद बाळासाहेब गाडवे (रा. सांगलीवाडी) याला अखेर अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
गाडवे याने शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरात एस एम ग्लोबल कंपनीचे कार्यालय सुरु केले होते. गुंतवणूकदारांना आर्थिक लाभाचे आमिष दाखवण्यात आले होते. गुंतवणूकदारांना केलेली गुंतवणूकीची मुद्दल व त्यावरील परतावा न देता तो टाळाटाळ करत होता. याप्रकरणी निलेश विश्वासराव पाटील व इतरांनी ९२ लाख ४ हजार ५१७ रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या गुन्ह्यात फसवणूकीची रक्कम मोठी असल्याने अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे याचा तपास वर्ग केला होता.
गाडवे याने जिल्ह्यास राज्यातील गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यास सांगून सुरुवातीला काही प्रमाणात परतावा दिला होता. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करुन त्यानंतर त्याने लाखो रुपयांचा गंडा घातला. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर अधीक्षक मनिषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
तक्रारीसाठी पुढे या
एस एम ग्लोबल कंपनीच्या माध्यमातून मिलींद गाडवे याने शेअर मार्केटव्दारे अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. गाडवे याने अजूनही काेणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत संपर्क साधून आपली तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी केले आहे.