सांगली : द्राक्ष हंगाम सुरू होऊन महिना झाल्यामुळे सांगली मार्केट यार्डात नवीन बेदाण्याची आवक सुरू झाली आहे. शुक्रवारी पाचशे टन बेदाण्याची आवक झाली असून त्यात वीस टन नवीन बेदाणा होता. चांगल्या दर्जाच्या बेदाण्यास किलोला १५० ते २२६ रुपये दर मिळाला आहे.
सांगली मार्केट यार्डात निघालेल्या सौद्यामध्ये ५० गाड्यांमधून ५०० टन बेदाण्याची आवक झाली आहे. या बेदाण्याचे तीस दुकानांमध्ये सौदे निघाले. नवीन चांगल्या बेदाण्यास प्रतिकिलो १५० ते २२६ रुपये दर मिळाला आहे. त्याखालोखाल १३० ते १७० रुपये, काळ्या बेदाण्याला ४० ते ६० रुपये दर मिळाला आहे. यंदा द्राक्षबागांची छाटणी उशिरा झाल्यामुळे बेदाणा हंगाम महिनाभर पुढे गेल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
नवीन बेदाण्याच्या सौद्यावेळी मनोज मालू, प्रशांत पाटील-मजलेकर, शेखर ठक्कर, संभाजी पाटील, हिरेन पटेल, विनायक हिंगमिरे, अरविंद ठक्कर, कृष्णा मर्दा, परेश मालू उपस्थित होते.