सांगली : उन्हाळ्याची चाहूल लागली की सर्वांना वेध लागतात ते फळांचा राजा अर्थात आंब्याचे. यंदाही सध्या बाजारपेठेत आंब्याची आवक सुरू झाली असून, मर्यादित आवक आणि व्यापाऱ्यांचीही संख्या कमी असल्याने दर वाढलेलेच आहेत.
सध्या रत्नागिरी व देवगड हापूस आंब्याची आवक होत असून, कर्नाटकच्या आंब्याची आवक सुरू झालेली नाही. सध्या आंब्याला डझनामागे ७५० ते १००० रुपयांपर्यंतचा दर द्यावा लागत आहे.गुढीपाडवा सणाच्या मुहूर्तावर आवक वाढण्याची चिन्हे असली तरी, दर जैसे थे राहण्याची शक्यता आहे. सांगली बाजारपेठेत फेब्रुवारीपासून आंब्याची आवक होत असते. आता मात्र आवक वाढली असून, दरही चांगला आहे. विष्णुअण्णा पाटील फळ मार्केटमध्ये आठवड्यातील सोमवार, बुधवार व शनिवारी आंब्याचे व्यवहार होत असतात.
सध्या व्यापाऱ्यांचीच संख्या कमी असल्याने एकूणच उलाढालही मर्यादित आहे. रत्नागिरी हापूसच्या २ हजार ते साडेतीन हजार पेट्या, तर देवगड हापूसच्या १५०० ते २५०० बॉक्सची आवक होत आहे.यंदा झाडांना मोहर खूप आला, त्यावेळीच या हंगामात आंबे मर्यादित असणार याची चाहूल लागली होती. त्यानुसार जादा मोहर लागला असला तरी, कडाक्याची थंडी व अचानक वाढलेल्या उन्हामुळे मोहर पूर्णपणे गळून गेला. त्यामुळे रत्नागिरी हापूस, पायरी व देवगड हापूससह राज्यातील आंब्याची आवक मर्यादितच असणार असल्याचे सांगलीतील व्यापाऱ्यांनी सांगितले.गुढीपाडव्यासाठी मागणी वाढणार असल्याने सोमवारपासून होणाऱ्या सौद्यात आंब्याची आवक वाढणार आहे. त्यातही कर्नाटकचा आंबा अजूनही येत नसल्याने दर कमी होण्याची शक्यता नाही. येत्या काही दिवसात पूर्ण क्षमतेने कर्नाटकातील आंबा येण्यास सुरुवात झाल्यानंतर दर कमी होणार आहेत.