सांगली : पावणेदोनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या सांगलीच्या पंचायतन गणेशोत्सवाचा एक भाग असलेल्या चोर गणपतीचे आगमन आज, शनिवारी झाले. विधिवत पूजा करुन त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यामुळे पंचायतन गणेशोत्सवास सुरुवात झाली आहे.चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी ही चोर गणपतीची परंपरा सुरू केली. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या या पर्यावरणपूरक ‘चोर गणपती’चे अत्यंत गुपचूपपणे मंदिरात आगमन होते. या गणपतीची प्रतिष्ठापना गुपचूपपणे होत असल्याने याला चोर गणपती म्हटले जाते. मंदिरातील पंचायतन संस्थान गणेशोत्सवाची सुरुवात ‘चोर गणपती’च्या आगमनाने होते. मंदिरातील गाभाऱ्यात या गणपतीच्या मूर्ती विधिपूर्वक बसविल्या जातात.या गणपतीची आख्यायिका वगैरे नाही. गणपती उत्सवाची चाहूल लागण्यासाठी तसेच वातावरण निर्मिती एवढाच या मागचा संदर्भ आहे. या चोर गणपतीची मूर्ती कागदाच्या लगद्यापासून तयार केली आहे. सुरुवातीपासून म्हणजे सुमारे पावणेदोनशे वर्षांपासून त्यांचे जतन करण्यात आले आहे. पण, या मूर्ती पाहिल्यास त्या कागदी लगद्याच्या आहेत, असे जाणवणारही नाही. नुकतीच रंगरंगोटी करण्यात आल्याने ही मूर्ती अधिक आकर्षक दिसते.चोर गणपती बसताच सांगली व परिसरात वातावरण गणेशमय होऊन गेले. चोर गणपती पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
सांगलीच्या मंदिरात चोर गणपतीचे आगमन, पावणेदोनशे वर्षांची परंपराच; आख्यायिका नाही तर..
By अविनाश कोळी | Published: September 16, 2023 5:11 PM