खानापूर : गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षा असणाऱ्या खानापूर पूर्वभागातील पळशी परिसरात गुरुवारी टेंभूच्या पाण्याचे आगमन झाले. दुर्गम तसेच शंभर टक्के निर्यातक्षम द्राक्षशेती पिकवणाऱ्या ठिकाणी कृष्णामाईचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे.
दोन वर्षांपूर्वी टेंभू योजनेच्या पाचव्या टप्प्याच्या माध्यमातून खानापूर घाटमाथ्यावर कृष्णेचे पाणी आले. हे पाणी अग्रणी नदीत सोडल्याने अनेक वर्षे कोरडी वाहणारी अग्रणी नदी वाहती झाली. त्याचप्रमाणे खानापूर तसेच सुलतानगादे साठवण तलावात पाणी सोडण्यात आल्याने घाटमाथ्यावरील टंचाई दूर झाली.
मात्र टेंभूच्या पाण्यापासून पळशी, हिवरे, बाणूरगड हा खानापूर तालुक्यातील पूर्व टोकाचा परिसर वंचित होता.
या परिसरात निर्यातक्षम द्राक्षशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. तेथे पाण्यासाठी शेतकऱ्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. अनेक कूपनलिका खोदल्या, बागांना टँकरने पाणी दिले. लाखो रुपये खर्चून पाच, दहा किलो मीटरवरून पाणी योजना केल्या.
या परिस्थितीमुळे टेंभू योजनेच्या पाण्याची मोठी प्रतीक्षा होती. आमदार अनिल बाबर यांच्या पाठपुराव्यामुळे अखेरीस पळशी परिसरात कृष्णामाईचे टेंभू योजनेच्या माध्यमातून आगमन झाले.
चौकट
पाण्याचे पूजन
बलवडी (खा) येथील वितरण विहिरीतून बंदिस्त पाइपलाइनद्वारे टेंभूचे पाणी पळशी परिसरात गुरुवारी सायंकाळी सव्वापाच वाजता अवतरले. पळशी येथील गावचा ओढा, शिंधीचा ओढा येथे सर्वप्रथम पाणी पोहोचले. पाण्याचे पूजन सरपंच संगीता जाधव, सुनिता जाधव, संभाजी जाधव, अरविंद पाटील, काकासाहेब जाधव, बबन जाधव, शहाजी इंगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.