सांगली : म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून जत पुर्व भागातील वंचित शेतक-यांना पाणी देण्यात यावे व इतर या मागणीसाठी संख (ता. जत) ते मुंबई पायी दिंडीचे सोमवारी सांगलीत आगमन झाले. सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर दिंडी आल्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांची भेट घेत आपले निवेदन सादर केले. त्यांनतर पुन्हा शेतकऱ्यांनी मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले.शुक्रवार दि ७ जूनपासून संख येथून तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी निघाली आहे आहे. सोमवारी सकाळी सांगलीत या दिंडीचे दिंडीचे आगमन झाले.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिंडी आल्यानंतर शेतकऱ्यांनी तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेतली व आपले निवेदन सादर केले.
या निवेदनात म्हटले आहे, मायथळ कॅनल पासून फक्त दोन कि.मी. अंतरावर असणा-या व्हस्पेठ तलावात कॅनलद्वारे पाणी सोडल्यास माडग्याळ, सोन्याळ, कुलाळवाडी, राजबावाडी, अंकलगी, उटगी, कारंडेवाडी, निगडी बु., लमाणतांडा, उमदी या सर्व गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याने पाणी सोडण्यात यावे, व्हसपेठ तलाव ते गुड्डापूर तलाव फक्त अडीच कि.मी. कॅनलचे काम केल्यास गुड्डापूर तलावातील पाण्याचा उपयोग आसंगी (जत), गोंधळेवाडी, संख, भिवर्गी, बेळोंगी, करजगी, बोरगी, हळ्ळी, बालगांव पर्यंत ओढा पात्रातून पाणी जाऊन यासर्व गावांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.
देवनाळ मेंड़ीगेरी ओढापात्रातून पाणी सोडल्यास ते पाच्छापूर (सालीगेरी) शेड्याळ ओढा पात्रापर्यंत येईल व शेड्याळ ओढा पात्रातून दरीकरोनूर, दरीबडची तलावात पाणी पोहोचेल या पाण्याचा उपयोग लमाणतांडा, पांडरेवाडी, खंडनाळ पर्यंत ओढा पात्रातून पाणी जाऊन यासर्व गावांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल तरी त्याची कार्यवाही व्हावी.कर्नाटकातील कनमडी तलावातून सिद्धनाथ तलावापर्यंत कॅनलद्वारे पाणी आल्यास तुर्कअसंगी, मोठेवाडी, कागनरी, पांडोझरी, पारधी तांडा, करेवाडी, तिकडी, या गावांनाही ओढा पात्रातून पाणी जाऊ शकते.
जर ही विशेष बाब म्हणून तरतूद करून निधी उपलब्ध करून फक्त दहा कि.मी. अंतराच्या टप्याचे काम केल्यास वरील सर्व गावांना याचा लाभ मिळेल, जत मधून म्हैसाळ योजनेचे आलेले पाणी जर सांगोल व मंगळवेढा या तालुक्यात म्हैसाळ योजनेचे पाणी जाऊ शकते तर आम्हा जत पुर्व भागात हे पाणी का मिळत नाही. तरी आमच्या मागण्यांचा विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी विक्रम ढोणे, लक्ष्मण जबगोंड, कामाणा बंडगर जेटलिंग कोरे, लिंबाजी माळी आमाना पाटील, बसप्पा माळी, दशरथ सुतार, अमृत पाटील, संजय धुमाळ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते