सांगली : लेखकांनी फक्त बोलण्यापेक्षा पुस्तकातले आपले लेखन आणि अनुभव बोलले पाहिजेत. लेखकाची ओळख ही त्याच्या लिखाणातून होणे गरजेचे आहे. कोणत्याही पुरस्कारापेक्षा आणि सन्मानापेक्षा लेखकाच्या लेखनाला वाचकांकडून मिळत असलेली दाद लाखमोलाची असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनी रविवारी केले.मिरज पंचायत समिती (शिक्षण विभाग) आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाळ (ता. मिरज) येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या विद्यार्थी साहित्य संमेलनात भांड बोलत होते. भांड म्हणाले की, लेखन समृध्द होण्यासाठी, लेखन सर्वसमावेशक होण्यासाठी गरिबीचा अनुभव महत्त्वाचा ठरला. त्यामुळेच लेखन बहरत गेले. जीवन जगत असताना कोणतीही खोटी गोष्ट करुन नव्हे, तर माझ्याबरोबर माझ्या शेजाऱ्याचीही प्रगती व्हावी, या भावनेने काम करीत राहिल्यास आनंद मिळतो. यातूनच मूकबधिर व अस्थिव्यंग विद्यालयाची सुरुवात केली. विद्यार्थीदशेत ‘मी कसा घडलो’ हे पुस्तक वाचले आणि तेव्हापासून लिखाणाची उर्मी निर्माण झाली. त्यामुळे लहानपणापासून वाचन वाढविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी तेजश्री पाटील, भूषण सुतार, किशोरी पाटील यांनी बाबा भांड यांची घेतलेली मुलाखत चांगलीच रंगतदार झाली. ओंकार सिध्द याच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनात ४२ कवी सहभागी झाले होते. दिवसभर विविध उपक्रमांनी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून सुमरन जमादार होती, तर स्वागताध्यक्ष म्हणून आदेश देशमाने, कविसंमेलनाध्यक्ष म्हणून ओंकार सिध्द याची निवड केली होती. संमेलनाचे संयोजन गटशिक्षणाधिकारी नामदेव माळी, एस. एस. बस्तवडे, नजीर चौगुले, दयासागर बन्ने, कृष्णात पाटोळे, रघुनाथ हेगणावर, विजय पाटील, विश्वास आठवले, राजेंद्र राऊत, बाळू गायकवाड, अमोल सातपुते, संतोष गुरव, शशिकांत नागरगोजे यांनी केले. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, साहित्यिका तारा भवाळकर, अविनाश सप्रे, एकनाथ पाटील, भीमराव धुळूबुळू, वर्षा चौगुले, गोविंद पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)मुलांचा उत्स्फूर्त सहभागसुबोध पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘किलबिल गोष्टी’ हे कथाकथन झाले. यात हर्षवर्धन कांबळे, पूजा सारावरे, जोया शेख, पवन पवार, नेहा वायंगणकर यांनी बहारदार कथा सादर केल्या. त्यानंतर पाठ्यपुस्तकातील लेखक शशिकांत शिंदे, प्रदीप पाटील आणि विमल मोरे यांच्याशी उपस्थित मुलांनी मनातील शंका आणि उत्सुकतेला वाट करुन दिली.
सन्मानापेक्षा लेखनाला मिळणारी दाद महत्त्वाची
By admin | Published: January 03, 2016 11:33 PM