संतोष भिसे ।सांगली : नदीपात्रातील नैसर्गिक वाळूच्या उपशावर हरित लवादाच्या निर्बंधाने कृत्रिम वाळू भाव खाऊ लागली आहे. वर्षभरात ब्रासमागे पाचशे ते हजारांंची दरवाढ झाली. वाढत्या मागणीमुळे दर चढेच आहेत.
गिलाव्याची कृत्रिम वाळू पाच हजार रुपये प्रतिब्रास आणि बांधकामासाठीची चार हजारांवर गेली आहे. एरवी बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहकांकडून कृत्रिम वाळूला नाक मुरडले जायचे, आज मात्र भरभक्कम पैसे मोजावे लागत आहेत. लवादाच्या निर्बंधांनंतर नदीतील औट्यांचे लिलाव थंडावले. मागणीच्या तुलनेत पुरवठा घटला. चोरट्या वाहतुकीवर कारवाईचा दंडुका महसूल विभागाने उगारला. परिणामी नैसर्गिक वाळूचा पुरवठा कमी झाला.
यंदा महापुराने प्रचंड प्रमाणात वाळू नदीत आली आहे, पण लिलावांची शक्यता कमीच आहे. सध्या जिल्ह्यात बेगमपूरसह अग्रणी व काही प्रमाणात कृष्णा नदीतील वाळू मिळते. बेगमपूरची वाळू उच्च दर्जाची समजली जाते. तिचा ब्रासचा दर बारा हजारांवर पोहोचला आहे. पुरेशा पुरवठ्याअभावी बांधकामे थंडावली, साहजिकच कृत्रिम वाळूशिवाय पर्याय राहिला नाही. जिल्ह्यात ८० हून अधिक क्रशरमध्ये तिचे उत्पादन होते. गिलाव्यासाठीची वाळू सायक्लोन तंत्राने अत्यंत बारीक तयार केली जाते. याने नैसर्गिक वाळूच्या तोडीस तोड गिलावा शक्य असल्याचा उत्पादकांचा दावा आहे.