विकास शहाशिराळा (सांगली) : कांदे (ता. शिराळा) येथील सुनील कुंभार हा तरुण २२ जानेवारीला अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापनेवेळी ऐतिहासिक सोहळ्यात अंदाजे दोन टन रांगोळीद्वारे कलेचे सादरीकरण करणार आहे. दि. १६ पासून अयोध्येतील प्रमुख मार्गांवर रांगोळी काढण्यास सुरुवात केली आहे.कांदेसारख्या छोट्या गावातून सुनील हा मित्र आकाश सुतार यांच्याबरोबर मोटरसायकलवरून १ हजार ८०० किलोमीटरचा प्रवास करत दि. १५ रोजी अयोध्येत पोहोचला आहे. विशाल पाटील तसेच इतरांनी त्याला सहकार्य केले आहे. शिराळा, इस्लामपूर, सांगली, सोलापूर, तुळजापूर, नांदेड, नागपूर, जबलपूर, कटने, प्रयाग, सुलतानपूर आदी २० शहरात प्रमुख मार्ग आणि मंदिर आदी ठिकाणी त्यांनी रांगोळी काढल्या. प्रत्येक ठिकाणी त्याचा सत्कार करण्यात आला.
अयोध्येतील राम मंदिर परिसरात कार्यक्रमाअगोदर तो रांगोळी काढणार आहे. रांगोळी काढण्यासाठीची परवानगी त्याला १४ नोव्हेंबर रोजी मिळाली होती. दि. १९ रोजी हनुमान गढी, लता मंगेशकर चौक येथे रांगोळी काढणार आहे. तसेच अंतिम १.८०० किलोमीटर लांबीच्या प्रमुख मार्गांवर रांगोळी काढणार आहेत. मुख्य कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी पहाटेपर्यंत तो रांगोळी काढणार आहे.
अयोध्येत तांदळाच्या पिठाची रांगोळी काढतात, त्यामुळे आपल्याकडची रांगोळी म्हणजे काय, रंगीत रांगोळीची सर्व जण अपूर्वाईने चौकशी करत आहेत. जबलपूरहून दोन टन रांगोळी आणली आहे. महाराष्ट्राचे नाव व संस्कृती अयोध्येत पोहोचविण्याचा माझा प्रयत्न आहे. राम मंदिर परिसरात रांगोळी काढून पूर्ण अयोध्यानगरी रांगोळीमय करण्याचा निर्धार आहे. - सुनील कुंभार, कांदे, ता. शिराळा