सांगली : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सर्वच घटकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यात कलाकारांची अवस्थाही वाईट आहे. त्यांनी आता ऑनलाइन मंचावरून आपली कला सादर करावी, असे आवाहन आ. सुधीर गाडगीळ यांनी केले.
सांगलीतील आ. सुधीर गाडगीळ युवा मंचच्या वतीने कलाकारांना मंगळवारी जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. जवळपास तीन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे कलाकारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे आ. गाडगीळ यांनी कलाकारांना मदत करण्याचा निर्णय घेतला. यावेळी आ. गाडगीळ म्हणाले, सध्या कोरोनामुळे सर्वच जण अडचणीत सापडले आहेत. त्यातून कलाकारही सुटले नाहीत. त्यांचे सर्व कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे त्यांना मदत देणे हे आमचे कर्तव्य आहे. असे सांगून पुण्याप्रमाणे एखादा ऑनलाइन कार्यक्रम करता येतो का हे पाहून असा कार्यक्रम आयोजित करू असेही त्यांनी सांगितले. आर्टिस्ट संघटनेचे अध्यक्ष अतुल शहा यांनी गाडगीळ यांनी कलाकारांची अडचण ओळखून केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संघटनेतर्फे आ. गाडगीळ यांना आभारपत्र देण्यात आले.
यावेळी नगरसेवक शेखर इनामदार, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, दीपक माने, शरद शहा, धनंजय गाडगीळ, आनंद कमते, राजेंद्र कानिटकर, विश्वजित पाटील, कृष्णा राठोड, अमित देसाई आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रश्मी सावंत यांनी केले. गणपती साळुंखे यांनी आभार मानले.