सांगली : महसूल प्रशासनाने सन 2019 मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणूक, महापूर व अवकाळी पाऊस या अनुषंगाने अत्यंत चांगले काम केले आहे. या सातत्याने केलेल्या कामामुळे त्यांना विश्रांती मिळण्यासाठी व तणावमुक्त करण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून नवीन उर्जा घेवून नविन वर्षात अत्यंत चांगले काम करावे. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व तणावमुक्त राहण्यासाठी कला व खेळ कायमस्वरूपी जोपासावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
सांगली जिल्हा महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा सन-2020 चे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे झाले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रोबेशनल आयएएस अधिकारी आशिष येरेकर, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) बाबासाहेब वाघमोडे, उपजिल्हाधिकारी निवडणूक डॉ. स्वाती देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, उपजिल्हाधिकारी (महसूल) विजया यादव, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आपल्यातील कलागुण जोपासावेत व खिलाडूवृत्तीने खेळावे. कला व खेळ जोपासणे हे स्पर्धे पुरते मर्यादित न राहता ते कायमस्वरूपी जोपासावेत. त्याचा शारिरीक लाभ होईल. फक्त कामाशी निगडीतच आपली ओळख निर्माण न करता त्या पलीकडे जाऊन कला व खेळातूनही आपली ओळख निर्माण करावी, असे आवाहन करून त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, मिरज, विटा, वाळवा, जत व कडेगाव उपविभागाच्या खेळाडूंनी संचलन करून मानवंदना दिली. तसेच क्रीडा ज्योत प्रज्वलन करून व कबुतर हवेत सोडून व दिप प्रज्वलन करून तसेच खेळाडूंना क्रीडा शपथ देवून स्पर्धेची सुरूवात करण्यात आली.
या प्रसंगी झालेल्या स्पर्धेमध्ये संचलनामध्ये प्रथम क्रमांक जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, व्दितीय क्रमांक उपविभागीय अधिकारी कार्यालय मिरज व तृतीय क्रमांक उपविभागीय अधिकारी कार्यालय कडेगाव यांनी पटकाविला. १०० मीटर धावणे पुरूष या स्पर्धेत प्रथम क्रमांक अभिजीत गायकवाड, मिरज उपविभाग, व्दितीय क्रमांक संजय जाधव, विटा उपविभाग, तृतीय क्रमांक अक्षय बनगर, जत उपविभाग तर महिलांच्या १०० मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक आशा मोहिते, कडेगाव उपविभाग, रूपा जाधव, वाळव उपविभाग व तृतीय क्रमांक गोपीका मांजरेकर, मिरज उपविभाग यांनी पटकाविला.
रविवार दिनांक १२ जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम, बुध्दीबळ, १०० मीटर व २०० मीटर धावणे, गोळाफेक, लांबउडी, ४x४०० रिले, थाळीफेक, खो-खो, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, थ्रोबॉल, कॅरम, फुटबॉल, कबड्डी, लॉनटेनिस, जलतरण, टेनिक्वाईट तसेच सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांनी महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून त्यांना तणावमुक्त व कणखर बनविणे, त्यांचे आरोग्य चांगले राहण्याच्या दृष्टीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. सूत्रसंचालन सुधीर गोंधळे यांनी केले. आभार मिरज उपविभागीय अधिकारी समिर शिंगटे यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील महसूल विभागाचे पुरूष व महिला अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.