लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अनिकेत कोथळे खून खटल्यातील संशयित बडतर्फ पोलीस हवालदार अरुण टोणे याचा मंगळवारी हृदयविकाराने मृत्यू झाला. चार दिवसांपूर्वी त्याची प्रकृती खालावल्याने त्याला कारागृह प्रशासनाने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते; पण प्रकृती बिघडल्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.
६ नोव्हेंबर २०१७ रोजी संशयावरून अनिकेत कोथळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासाच्या नावाखाली त्याच्यावर ‘थर्ड डिग्री’चा वापर केला होता. त्यातच अनिकेतचा मृत्यू झाला. त्यानंतर संशयितांनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने अनिकेतचा मृतदेह आंबोली घाटातील निर्जनस्थळी जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी संशयित बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे आणि झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले आदींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. गेल्या काही दिवसांपूर्वी या खटल्याची जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुनावणीसाठी संशयितांना न्यायालयात आणणे सोयीचे व्हावे, यासाठी सर्व संशयितांना सांगलीच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते.
चार दिवसांपूर्वी टोणे याला त्रास जाणवू लागला. कारागृह प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर खासगी रुग्णालयात त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. मंगळवारी दुपारी हृदयविकाराचा झटक्यात त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी सायंकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.