वैभववाडी : पुनर्वसनाच्या प्रतीक्षेतील अरुणा प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाचा धडाका सुरू ठेवत बुधवारी प्रशासनाच्या निषेधार्थ प्रकल्पस्थळी मुंडण आंदोलन छेडले. शुक्रवारी प्रातिनिधीक श्राद्ध आंदोलन छेडण्याचा निर्णय प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे. दरम्यान, मुख्य अभियंता यांच्या सूचनेवरून होणारी प्रकल्पग्रस्त आणि अधिकाऱ्यांमधील आजची बैठक रद्द झाल्याचे प्रकल्पग्रस्तांचे नेते तानाजी कांबळे यांनी सांगितले.
विस्थापित होणाºया सर्व प्रकल्पग्रस्तांना २३ मूलभूत नागरी सुविधांची पूर्तता न करताच अरुणा प्रकल्पाची घळभरणी करण्यात आली. या घळभरणीमुळे भूखंड किंवा मोबदला न मिळालेल्या काही प्रकल्पग्रस्तांची घरे पाण्यात बुडाली. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी गेले काही महिने अरुणा प्रकल्पग्रस्त सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन छेडत आहेत.
धरणाचे उर्वरित काम सुरू करण्यासाठी चार दिवसांपूर्वी प्रशासनाने साठलेल्या पाण्याचा विसर्ग सुरू करण्याबाबत सतर्कतेची नोटीस केल्यानंतर प्रलंबित मागण्या मार्गी लागेपर्यंत प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग करण्यास कडाडून विरोध करीत प्रकल्पग्रस्त सांडव्यात उतरले होते. त्यानंतर निवेदन स्वीकारण्यावरून दोन दिवसांपूर्वी ठेकेदार कंपनीचे कर्मचारी आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये वाद झाला होता. गेल्या चार-पाच दिवसांपासून काही प्रकल्पग्रस्तांनी ठेकेदार कंपनीच्या कार्यालयाबाहेर तळ ठोकला आहे. प्रकल्पस्थळी बुधवारी प्रकल्पग्रस्तांनी प्रशासनाच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन छेडले. प्रकल्पग्रस्त अशोक नागप, सुरेश नागप, मुकेश कदम, परशुराम सुतार यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मुंडण करून घेतले. यावेळी प्रकल्पग्रस्त तानाजी कांबळे, सुरेश आप्पा नागप, प्रकाश सावंत, अजय नागप, सूर्यकांत नागप, रामचंद्र नागप, धोंडी नागप, वसंत नागप, एकनाथ मोरे, वासुदेव नागप, गोपीनाथ नागप, मनोहर नागप, प्रसन्न नागप आदी उपस्थित होते.
दरम्यान, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एस. आर. तिरमनवार यांनी जिल्ह्यातील अधिकाºयांना बुधवारी प्रकल्पग्रस्तांची बैठक घेण्याची सूचना गेल्या शनिवारी केली होती. त्यामुळे बुधवारी ही सभा होईल अशी आशा होती. परंतु ही बैठकही होऊ शकलेली नाही. प्रलंबित मागण्यांबाबत कोणताही ठोस मार्ग निघत नसल्याने आंदोलनाचे पुढचे पाऊल श्राद्ध आंदोलन असणार आहे. हे श्राद्ध आंदोलन शुक्रवारी प्रकल्पस्थळीच होणार आहे.तोपर्यंत काम नाहीचप्रकल्पाचे उर्वरित काम करण्यासाठी धरणातील पाण्याचा विसर्ग करणे अपरिहार्य आहे. परंतु, जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाही; तोपर्यत उर्वरित काम सुरू होऊच द्यायचे नाही असा निर्धार आता प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.
दोन-तीन दिवसांपासून प्रकल्पग्रस्त दिवसभर प्रकल्पस्थळी ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागाची कुचंबणा झाल्याचे दिसून येत आहे.अरुणा प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी प्रकल्पस्थळी मुंडण आंदोलन छेडून प्रशासनाचा निषेध नोंदविला.