सांगली : कुरळप (ता. वाळवा) येथील मिनाई आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस कोठडीची हवा खात असलेला शाळेचा संस्थापक व मुख्य संशयित अरविंद पवार याने रविवारी पोट व छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने त्याला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.डॉक्टरांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली, पण दाखल करुन घेण्यास नकार दिला. रात्री उशिरापर्यंत त्याला दाखल करून घेण्यावरुन शासकीय रूग्णालयामध्ये घोळ सुरु होता.कुरळप (ता. वाळवा) येथील मिनाई आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुलींच्या लैंगिक शोषणाचा प्रकार चार दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. याप्रकरणी अरविंद पवार व आश्रमशाळेत स्वयंपाककाम करणारी महिला मनीषा कांबळे या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. या संतापदायक घटनेचे कुरळपमध्ये तीव्र पडसाद उमटले. ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध केला. काहींनी मिनाई आश्रमशाळेवर हल्ला करुन तोडफोड केली. मुख्याध्यापकास शाळेत घुसून बेदम चोप दिला. अरविंद पवार यास कुरळप पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवणे धोकादायक आहे. कदाचित ग्रामस्थांकडून पोलीस ठाण्यावर हल्ला होऊ शकतो, असा विचार करुन पोलिसांनी त्याला इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.रविवारी दुपारी त्याने, कोठडीत पोटात व छातीत दुखत असल्याची तक्रार केली. यामुळे त्याला कोठडीतून बाहेर काढून इस्लामपुरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करुन डॉक्टरांनी त्यास सांगलीत शासकीय रुग्णालयात हलविण्यास सांगितले. पोलिसांकडे वाहनही नव्हते. त्यांनी १०८ रुग्णवाहिकेतून त्याला सायंकाळी दाखल केले. त्याच्यासोबत केवळ दोनच पोलीस होते. एक गणवेशात, तर दुसरा साध्या वेशात होता. आकस्मिक दुर्घटना विभागात त्याची तपासणी केली. पण डॉक्टरांना, त्याला दाखल करुन घेण्याची गरज वाटली नाही. त्याचवेळी पवारने जास्तच दुखत असल्याची तक्रार केली. त्यामुळे त्याला सोनोग्राफी तपासणीला नेण्यात आले. तो दाखल होण्यास इच्छुक होता, पण डॉक्टरांना गरज वाटत नव्हती. रात्री उशिरापर्यंत त्याला दाखल करुन घेऊन उपचार करण्यावरुन घोळ सुरु होता.धोकादायक प्रवासअरविंद पवार याच्याविरुद्ध अजूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. असे असतानाच केवळ दोनच पोलीस त्याला घेऊन इस्लामपूरहून सांगलीपर्यंत आले. रुग्णालयात आल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी त्यांना मदत केली. इस्लामपूरच्या पोलीस उपअधीक्षक शर्मिला वालावलकर यांनी पवारला रुग्णालयात हलविल्यानंतर याचा आढावा घेतला. तसेच बंदोबस्त वाढविण्याचे आदेश दिले.