घनशाम नवाथे
सांगली : पन्नास रुपयांच्या हुबेहूब भारतीय चलनी नोटाप्रमाणे बनावट नोटा बनवणाऱ्या मिरजेतील अहद महंमद अली शेख (वय ४४, रा. शनिवार पेठ, मिरज) याच्या चौकशीत त्याने आजअखेर सुमारे ४० लाखांच्या बनावट नोटा चलनात आणल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे. त्याच्याकडून सव्वा दोन लाखांचा प्रिंटर, लॅपटॉप जप्त केला आहे. त्याच्याकडून नोटा घेणाऱ्या एजंटाचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.
अधिक माहिती अशी, शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरणचे पथक गस्त घालत असताना आकाशवाणी केंद्राजवळ एकजण बनावट नोटा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अंमलदार संतोष गळवे, गौतम कांबळे यांना मिळाली होती. त्यानुसार दोन पथके बनविण्यात आली. सापळा रचून अहद शेख याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीमध्ये ५० रुपयांच्या बनावट ७५ नोटा आढळल्या. कसून चौकशी केली असता मिरजेत त्याचा बनावट नोटा तयार करण्याचा छापखानाच सुरू केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार सांगली शहर पोलिसांनी तेथे छापा टाकला. पन्नास रुपयांच्या एक लाख ९० हजारांच्या बनावट नोटा, स्कॅनर, प्रिंटर, कटिंग मशीन, नोटा छापण्याचा कागद, शाई, प्रिंटिंग मशीन, कागदांची बंडले असा एकूण ३ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
अहद शेख याला तपासासाठी पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासात त्याने जवळपास एक वर्षापासून बनावट नोटा छापण्यास सुरूवात केली होती. आतापर्यंत चाळीस लाखांच्या बनावट नोटा चलनात आणल्याची माहिती पुढे आली. त्याचे आंतरराज्य कनेक्शन असल्याची शक्यता आहे. ७० रुपयाला बनावट शंभर रुपये तो देत असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे त्याच्या एजंटाचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक मोरे यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक महादेव पोवार करीत आहेत. अहद शेख याची गुरूवारी पोलिस कोठडी संपणार आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.अहदला बॉलिवूड चित्रपटांचे आकर्षण-
अहद हा दहावी उत्तीर्ण आहे. परंतु त्याला बॉलिवूडच्या चित्रपटांचे चांगलेच आकर्षण आहे. चित्रपट बघून तो अधून मधून इंग्लिश शब्द बोलण्यात वापरतो. तो पूर्वी भंगार विक्रीचा व्यवसाय करत होता. भंगारातील बॅटऱ्यांतून तो काहीतरी करत असायचा. करामती म्हणून त्याला ओळखले जायचे. अखेर बनावट नोटामध्ये सापडल्यानंतर सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.