सांगली : जिल्ह्यात गेल्या वर्षभराच्या कालावधीत तब्बल दीड लाख ह्रदयशस्त्रक्रिया झाल्या आहेत. यातून ह्रदयरुग्णांचे प्रचंड मोठे वाढते प्रमाण स्पष्ट झाले आहे. यामध्ये बायपास शस्त्रक्रियांची संख्या खूपच मोठी आहे.या सर्व शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून झाल्या आहेत. त्याव्यतिरिक्त स्वखर्चाने झालेल्या शस्त्रक्रियांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे एकूण ह्रदयशस्त्रक्रियांची संख्या दोन लाखांवर जाऊ शकते. यातील बहुतांश शस्त्रक्रिया मिरजेतील तीन खासगी रुग्णालयांतच झाल्या आहेत. ह्रदयाची झडप बदलणे, बायपास करणे, स्टेंट वापरणे या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. काही केसेसमध्ये एकेका रुग्णावर ह्रदयाच्या तीन-तीन प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. एकूण ९५ हजार ८३७ रुग्णांवर १ लाख ५६ हजार ३३२ शस्त्रक्रिया झाल्या आहेत.पुरेशा ह्रदयरोगतज्ज्ञांची उपलब्धता, शस्त्रक्रियेची सुसज्जता, ह्रदयविकार उद्भवल्यानंतर तातडीने उपलब्ध होणाऱ्या वैद्यकीय सुविधा, जनआरोग्य योजनेतून मंजुरीची सुलभ आणि वेगवान प्रक्रिया यामुळे ह्रदयशस्त्रक्रियांची संख्या वाढली आहे. कधीकाळी बायपास शस्त्रक्रिया म्हणजे दुर्मिळ मानली जायची, पण गेल्या वर्षभरात या शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टरांसाठी जखमेवर बॅंडेज बांधण्याइतक्या सोप्या झाल्याचे दिसते.
महात्मा फुले योजनेत ३८ रुग्णालयेजिल्ह्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ३८ रुग्णालयांत उपचार केले जातात. त्यामध्ये सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालय व इस्लामपुरातील उपजिल्हा रुग्णालयाचाही समावेश आहे. उर्वरित सर्व खासगी रुग्णालये आहेत. त्यापैकी सर्रास रुग्णालये सांगली, मिरज शहरांत आहेत.
विटा, कवठेमहांकाळ, पलूस रुग्णालये काढलीविटा, पलूस, कवठेमहांकाळ ग्रामिण रुग्णालयेदेखील महात्मा फुले योजनेत समाविष्ट होती. पण १० वर्षांत एकही शस्त्रक्रिया न झाल्याने त्यांना योजनेतून काढून टाकण्यात आले. या रुग्णालयांत शस्त्रक्रियेसाठी तज्ज्ञ डॉक्टर्स, भूलतज्ज्ञ, सुसज्ज शस्त्रक्रियागृह आदी सोयीसुविधा नाहीत. त्यामुळे शस्त्रक्रिया होऊ शकल्या नाहीत. परिणामी त्यांना योजनेतून कमी करण्यात आले. त्याचा फटका या तालुक्यांतील रुग्णांना बसतो. त्यांना योजनेतून शस्त्रक्रियांसाठी सांगली, मिरजेला यावे लागते.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ह्रदयशस्त्रक्रियेच्या पॅकेजला मंजुरीची प्रक्रिया सुलभ आहे. सांगली, मिरजेतील खासगी रुग्णालयांत या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या होतात. त्यामुळेच वर्षभरात दीड लाख शस्त्रक्रिया होऊ शकल्या. - डॉ. सुभाष नांगरे, जिल्हा समन्वयक, महात्मा फुले जनआरोग्य योजना