अशोक डोंबाळेसांगली : जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समित्यांचे आरक्षण सोडत होताच इच्छुकांनी मोर्चेबांधणी करून मिनी मंत्रालयात (जिल्हा परिषद) जाण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. विद्यमान आणि २०१७ पूर्वीच्या पदाधिकारी, सदस्यांना निवडणुकीत संधी मिळणार असल्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. पंचायत समितीच्या माजी सभापतींनाही या निवडणुकीत जिल्हा परिषदेत येण्याची संधी मिळणार आहे.
जिल्हा परिषद मतदारसंघाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. गुरुवारी सोडत निघताच इच्छुकांनी उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आरक्षित मतदारसंघातील प्रबळ उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. जातीचे दाखले काढण्यासह उमेदवारांच्या अन्य त्रुटी दूर करण्यासाठी गडबड सुरु झाली आहे. आरक्षण बदलल्याने अनेकांची संधी हुकली. नेत्यांसह कार्यकर्त्यांना धक्का बसला. काही मतदारसंघात आरक्षणामुळे दुसऱ्या फळीला संधी उपलब्ध झाली आहे.
यांची संधी हुकलीमाजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, प्राजक्ता कोरे, सुहास बाबर, शिवाजी डोंगरे, काँग्रेसचे पक्षप्रतोद जितेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद अर्जुन पाटील, माजी सभापती प्रमोद शेंडगे, प्राचार्या डाॅ. सुषमा नायकवडी, जगन्नाथ माळी, आशा पाटील, सुनीता पवार, अरुण राजमाने, अरुण बालटे, सुरेंद्र वाळवेकर यांचे मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळे त्यांची पुन्हा जिल्हा परिषदेत निवडणूक येण्याची संधी हुकली आहे.
यांना मिळू शकते संधी
माजी अध्यक्ष देवराज पाटील (कासेगाव), माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, सम्राट महाडिक (पेठ), शरद लाड (कुंडल), जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, आटपाडीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील (करगणी), माजी सभापती मनीषा पाटील (आटपाडी), ब्रह्मनंद पडळकर (निंबवडे), तम्मनगौडा रवी-पाटील (जाडरबोबलाद), अमित पाटील (येळावी), विराज नाईक (मांगले), संभाजी कचरे, वैभव शिंदे (बागणी), रणधीर नाईक (पणुंब्रे तर्फ वारुण), आप्पाराया बिरादार (मुचंडी), संजीवकुमार पाटील (कुरळप), डी. के. पाटील (चिंचणी), नितीन नवले (अंकलखोप), सतीश पवार (मणेराजुरी).
‘हाय व्होल्टेज’ लढतीपलूस तालुक्यातील कुंडल, अंकलखोप, वाळवा तालुक्यातील कासेगाव, वाटेगाव, पेठ, कुरळप, बागणी, आटपाडी तालुक्यातील करगणी, जत तालुक्यातील वाळेखिंडी, मुचंडी, कडेगाव तालुक्यातील तडसर, देवराष्ट्रे, तासगाव तालुक्यातील चिंचणी, येळावी, कवठेएकंद, मणेराजुरी, कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव, शिराळा तालुक्यातील मांगले, मिरज तालुक्यातील भोसे, आरग जिल्हा परिषद गट खुले झाल्यामुळे येथील लढती ‘हाय व्होल्टेज’ होणार आहेत.
आता लक्ष लाल दिव्याच्या गाडीकडे
जिल्हा परिषद निवडणुका घोषित होण्याच्या पूर्वी सहा महिने अध्यक्षपदाची आरक्षण सोडत होत होती; पण यावेळी ओबीसी आरक्षणाचाच प्रश्न लवकर सुटला नसल्यामुळे अध्यक्षपदाची आरक्षण सोडत झालीच नाही. यामुळे सर्वसाधारण गटातील इच्छुकांचे लक्ष आता लाल दिव्याच्या गाडीकडे लागून राहिले आहे.
जिल्हा परिषद ६८ गटाचे आरक्षण-सर्वसाधारण गट : २१-सर्वसाधारण गट (महिला) : २१-ओबीसी : ९-ओबीसी (महिला) : ९-अनुसूचित जाती : ४-अनुसूचित जाती (महिला) : ४
२०१२ च्या पदाधिकाऱ्यांना संधीअध्यक्षपद सर्वसाधारण असल्यामुळे २०१२ ची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. करगणी गटातून अमरसिंह देशमुख, कासेगावातून देवराज पाटील यांनी चुरशीच्या लढतीत विजय खेचून आणून अध्यक्षपद भूषविले होते. कामेरीतून रणजित पाटील यांनाही उपाध्यक्षपदाची संधी मिळाली होती. त्यांचे मतदारसंघ सर्वसाधारण झाल्यामुळे जिल्हा परिषदेत पुन्हा येण्याची संधी मिळणार आहे.