अशोक पाटीलइस्लामपूर : स्थानिक स्वराज्य संस्थेवर लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय राजवटीमध्ये अधिकाऱ्यांची बडेजावी सुरू आहे. प्रशासनाकडून नागरिकांची कामांसाठी अडवणूक सुरू आहे. याउलट आगामी निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी सार्वजनिक कामांवर भर दिला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्राच्या सहली काढून मतदारांना खुश करण्याच्या प्रयत्न लोकप्रतनिधी करू लागले आहेत.लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराचा मुद्दा कळीचा ठरला होता. त्यामुळेच लोकप्रतिनिधी यांनी सार्वजनिक गणेश मंडळे व कार्यक्रमांना देणग्यांचा सपाटा लावला आहे. दुसरीकडे मात्र गेल्या ३ वर्षांपासून लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय अधिकारी ते शिपाईपर्यंत चिरीमिरीचे जाळे भक्कम होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची शासकीय कामे रखडली जात आहेत.
शासकीय कार्यालयात हेलपाटे वाढलेसर्वसामान्यांच्या जीवनाला अनुसरून अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टी पुरवतानाच भ्रष्टाचार होताना दिसतो. शासनामार्फत पुरवण्यात येणाऱ्या धान्यामध्ये अफरातफर होते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मुखापर्यंत अन्न जातच नाही. महसूलमधील सर्वच विभागात वजन ठेवल्याशिवाय फायली पुढे सरकत नाहीत. शासनाच्या विविध योजनेचा फायदा मिळण्यापेक्षा पूर्ततेसाठी शासकीय कार्यालयात लागणारा वेळ आणि या ठिकाणी चाललेल्या भ्रष्टाचारामुळे योजनेचा फायदा तर मिळतच नाही उलट सर्वसामान्यांना प्रशासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात.
चोरावर मोरप्रशासकीय आणि निमप्रशासकीय कार्यालयातील भोंगळ कारभाराचा फायदा काही जण सामाजिक कार्याच्या नावाखाली उठवतात. नामधारी नेते माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवून समोरील व्यक्तींना लक्ष्य करून पैसे उकळण्याचा धंदा करतात. अशाच एका भामट्याला महिलांनी चोप दिल्याची घटना इस्लामपूर परिसरात नुकतीच घडली.