हणमंत पाटीलसांगली : ‘साहेब, आमचं हातावरचं पोट हाय बघा. म्या विट्याच्या चौकातील रस्त्यावर लोकांच्या पायातली पैताणं शिवतूय अन् पोरगा शिक्षकी पेशा करून कुटुंब चालवतूय; पण त्या दिवशी मामलेदार कचेरीतून आलेल्या रस्त्याच्या निकालाचा कागद त्यानं बघितल्यावर आनपाणी सोडलं आन् म्या अन् माझी बायको बाहेर गेल्याचं बघून पोरानं आन सुनेनं अन्नात औषध कालवून खाल्लं बघा. आता दाद कुणाकडं मागायची तुमीच सांगा?’विट्यातील फुलेनगर भागात आठवड्यापूर्वी म्हणजे ३१ जुलैला एका दाम्पत्याने फेसबुक लाइव्ह करीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. ही घटना ऐकल्यावर कोणालाही तो स्टंट वाटेल; पण आपल्या घराला व शेताला रस्ता मिळत नाही. सरकारी यंत्रणा न्याय मिळवून देण्यास कुचकामी ठरतेय. त्या नैराश्येतून सहायक शिक्षक असलेल्या प्रशांत कांबळे व त्याच्या पत्नीने अन्नात कीटकनाशक मिसळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वास्तव समोर आले आहे.या दाम्पत्याला वेळेत हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने त्यांचा जीव वाचला; पण प्रशांत कांबळेचे पुढे काय झाले म्हणून ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने दोन दिवसांपूर्वी जागेवर जाऊन पाहणी केली, तर त्याच्या घराला कुलूप होते. आजूबाजूला शांतता होती. अधिक चौकशी केल्यानंतर कुटुंब घर सोडून बाहेरगावी गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर प्रशांत कांबळे यांचे वडील प्रल्हाद कांबळे यांच्याशी संपर्क झाला.या प्रकरणाविषयी प्रल्हाद कांबळे म्हणाले, ‘साहेब आम्ही आता कोणाचं फोन उचलत नाय. मिटवून घ्या म्हणून धमक्याचं फोन येतात. आमाला मामलेदार कचेरीतून न्याय मिळाला नाय. मग पोरानं हे टोकाचं पाऊल उचललं, म्हणून आमी घर सोडलंय. ही घटना व्हायच्या अगुदर चार दिवस पोरानं अन्नपाणी सोडलं. आमी विचारलं तर म्हणायचा की, तुम्ही तुमची काळजी घ्या. माझ्या बाळांना सांभाळा. असं काय म्हणतूय म्हणून आमी त्याला ओरडलूसुदा; पण त्यानं ऐकलं नाय. आता मामलेदारांचा निकाल बदललाय. आता आपल्याला कोण न्याय देणार, म्हणून त्यानं जीवनाला कंटाळून औषध घेतलं बगा.’
रस्त्यासाठी गाव अन् घर सोडण्याची वेळआता उपचार करून दवाखान्यातून मुलाला सोडलंय; पण आमी आता विट्यातल्या घरी जायला घाबरतूय. ज्या घराच्या रस्त्यासाठी माझा मुलगा जीव देतोय. त्या घराचं अन् गावाचं काय करायचं, म्हणून आता बाहेरगावी येऊनशना राहिलूय. आता खऱ्याची दुनिया राहिली नाय बघा. आता तूच न्याय दे, म्हणून देवाला हात जोडतूया बगा’, असे बोलत असताना प्रल्हाद कांबळे यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले.
एका तहसीलचे दोन निकालविटा-खानापूर तहसील कार्यालयात गेल्या दीड वर्षापासून प्रशांत कांबळे यांच्या रस्त्याच्या निकालावर सुनावणी सुरू होती. त्या काळात कांबळे कुटुंबीयांनी कार्यालयासमोर उपोषणही केले. त्यानंतर २५ मे २०२३ रोजी विटा तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांचे नाव, सही व शिक्क्यासह निकाल कार्यालयातून बाहेर आला. त्यामध्ये प्रशांत कांबळे यांना रस्ता खुला करण्याचे आदेश आहेत. मात्र, हा निकाल मी दिलेला नसल्याचे तहसीलदार गायकवाड यांनी सांगितले. त्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यातील निकाल विरोधात गेल्याने तहसील कार्यालयाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातेय.
प्रशांत कांबळे यांच्या रस्त्याच्या प्रकरणात स्थळ पाहणी करून त्यांच्यातील पूर्वीच्या तडजोडपत्राचा अभ्यास करून मी १८ जुलैला निकाल दिला. त्यासाठी माझ्यावर कोणताही राजकीय दबाव नव्हता. मात्र, मे महिन्यातील निकालाची प्रत खोटी आहे. त्याची चौकशी करण्याविषयी मी पोलिसांना कळविले आहे. -उदयसिंह गायकवाड, तहसीलदार, खानापूर-विटा
प्रशांत कांबळे आत्महत्या प्रकरणात तहसील कार्यालयाकडून कोणत्याही प्रतिनिधीने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केलेली नाही, तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही, तसेच कोणीही अद्याप तक्रार दिलेली नाही. त्यामुळे आम्ही या प्रकरणात अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. -संतोष डोके, पोलिस निरीक्षक, विटा
‘लोकमत’चे तीन प्रश्न
- आत्महत्येचा प्रयत्न हा गुन्हा, मग एकही गुन्हा दाखल का नाही?
- तहसीलदारांचे नाव, सही व शिक्क्यासह निकाल बाहेर आला, मग त्याची चौकशी का झाली नाही?
- महसूल व पोलिस यंत्रणा न्याय देण्यासाठी, की तडजोड करून प्रकरण मिटविण्यासाठी आहे?