संतोष भिसेसांगली : महिलांना एसटीमधून अर्ध्या तिकिटात प्रवासाची घोषणा शुक्रवारी अचानक अमलात आली, त्यामुळे प्रवासी व वाहकांना अनेक गमतीजमतींना सामोरे जावे लागले. वाहकांकडे महिलांच्या सवलतीची उपलब्ध तिकिटे नसल्याने चक्क ज्येष्ठ नागरिकांसाठीची तिकिटे द्यावी लागली.महिलांना सवलतीत प्रवासाचे महामंडळाचे परिपत्रक गुरुवारी रात्री विविध आगारांना मिळाले. त्यानंतर प्रशासनाने तिकीट यंत्रांमध्ये माहिती भरली. लेडीज स्पेशल तिकिटाचे फंक्शन ७७ व्या क्रमांकावर भरले. सकाळी ड्युटीसाठी यंत्रे घेतलेल्या वाहकांना सवलतीची तिकिटे मिळाली. पण परगावी मुक्कामाला असणाऱ्या व शुक्रवारी सकाळी प्रवासाला निघालेल्या वाहकांकडील यंत्रांमध्ये मात्र जुनेच पूर्ण रकमेचे तिकीट होते. प्रशासनाने त्यांना व्हॉट्सॲपवरून सवलतीची माहिती व सूचना दिली. पर्याय म्हणून महिलांना ज्येष्ठ नागरिकांसाठीची तिकिटे देण्यास सांगितले.योजना सुरू झाल्याची महिती नसलेल्या महिलांना अर्धे तिकीट म्हणजे सुखद धक्काच ठरला.कर्नाटक किंवा इतर आंतरराज्य प्रवासासाठी सीमेपर्यंत सवलत देण्यात आली. पुढे आंतरराज्य प्रवासासाठी नियमित म्हणजे पूर्ण तिकीट देण्यात आले. तशीच रचना यंत्रामध्ये अपलोड करण्यात आली होती. शिवशाहीसाठी मात्र वातानुकूलन शुल्क, तसेच जीएसटी व अन्य कर लागू असल्याने मूळ भाड्याच्या ५० टक्क्यांपेक्षा काही रक्कम जास्त द्यावी लागत आहे.खासगी वाहतुकीला दणकामहिलांना सवलतीत प्रवास योजनेमुळे खासगी वाहतुकीला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. वडाप, तसेच लांबपल्ल्याच्या आरामगाड्यांचे प्रवासी एसटीकडे वळण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी सांगली, मिरज आगारांतून लांबपल्ल्याच्या शिवशाही गाड्या फुल्ल झाल्याचे दिसले. आरक्षणासाठीही रांगा लागल्या होत्या. ही योजना एसटीला ऊर्जितावस्था आणेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.एसटी, रेल्वे एकाच दरातएक्सप्रेस रेल्वेचे जनरल श्रेणीचे आणि एसटीचे ५० टक्के सवलतीचे तिकीटदर आता जवळपास एकाच पातळीवर आले आहेत. दोहोंमध्ये फक्त ३०-४० रुपयांचाच फरक राहिला आहे. त्यामुळे महिला प्रवासी रेल्वेऐवजी एसटीला प्राधान्य देतील असाही अंदाज आहे.
एसटी भाडे निम्म्यावर; पण महिलांना तिकीट ज्येष्ठांचे, पहिल्या दिवशीच गमतीजमती
By संतोष भिसे | Published: March 18, 2023 1:00 PM