फोटो ओळ : पांडोझरी (ता. जत) येथे आसंगी तुर्क-मोटेवाडी साठवण तलावाचे पाणी कालव्यामधून ओढापात्रात सोडले आहे. यामुळे येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा भरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : पांडोझरी (ता. जत) येथे पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आंसगी तुर्क-मोटेवाडी साठवण तलावाचे पाणी कॅनॉलमधून ओढापात्रात सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत पाटबंधारे विभागाकडे मागणी केली होती. तसेच उपसरपंच नामदेव पुजारी व शेतकऱ्यांनी आमदार विक्रम सावंत, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांच्याकडेही मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नातून ओढापात्रात पाणी दाखल झाले आहे.
सध्या पांडोझरीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ओढापात्रातील सिमेंट बंधारे, कोल्हापूर बंधारे पाण्याअभावी कोरडे पडले होते.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आसंगी तुर्क साठवण तलावाच्या कालव्यातून पांडोझरी ओढापात्रात पाणी सोडावे. यासाठी आ. विक्रम सावंत, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केला. अखेर या कालव्यातून पाणी ओढापात्रात सोडण्यात आले.
तलावातून सोडलेले पाणी पांडोझरीत दाखल झाले. या पाण्यामुळे द्राक्षे, डाळिंब, ऊस, भाजीपाला व उन्हाळी पिकांना फायदा होणार आहे. कोरड्या पडलेल्या ओढापात्रात पाणी खळखळल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी पाटबंधारे शाखाधिकारी संजय मोरे, कालवा निरीक्षक एन. ए. शेख, चंद्रकांत कांबळे, तुकाराम बिराजदार, हणमंत बिराजदार उपस्थित होते.