२१सांगली सीटी०१ : आशा, गटप्रवर्तक महिलांनी विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून साेमवारी दोन तास ठिय्या मारला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आशा, गटप्रवर्तक महिला कर्मचारी कोरोना संकटात जीव धोक्यात घालून रुग्णांना आरोग्य सेवा देत आहेत. गेल्या वर्षी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या विशेष अभियानाच्या सर्व्हेचे काम करून घेऊनही त्यांना योग्य मानधन दिले नाही. घटनेच्या निषेधार्थ आशा, गटप्रवर्तकांनी सोमवारी जिल्हा परिषद आणि पालकमंत्री जयंत पाटील यांच्या कार्यालयांवर मोर्चा काढून निषेध केला. दोन तास ठिय्या मारला होता.
सिटूसह विविध संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या कृती समितीतर्फे आशा, गटप्रवर्तक महिलांनी गेल्या सात दिवसांपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. सात दिवसांत आंदोलकांच्या मागण्यांकडे सरकार लक्ष देत नसल्यामुळे लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनचे सचिव कॉ. उमेश देशमुख, अध्यक्षा कॉ. मीना कोळी, जिल्हा संघटक कॉ. हणमंत कोळी, सुरेखा जाधव, सुवर्णा सनगर यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री जयंत पाटील यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढून सरकारचा निषेध केला. जवळपास दोन तास कार्यालयासमोर ठिय्या मारला होता.
आशा गटप्रवर्तक संघटनेच्या जनरल सेक्रेटरी सुमन पुजारी व आयटक आशा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ. शंकर पुजारी, विद्या कांबळे, ऊर्मिला पाटील, राखी पाटील, शारदा गायकवाड, इंदुमती यलमर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला होता, तसेच जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात दोन ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.
या दोन संघटनांनी दोन ठिकाणी मोर्चे काढले असले तरी त्यांच्या मागण्या एकच आहेत. त्या म्हणजे आशा व गटप्रवर्तकांकडून अत्यंत जीव जोखमीत घालणारी कामे करून घेतली. मात्र, या कामाचा कोणताही अतिरिक्त मोबदला दिला नाही. आता रॅपिड अँटिजन टेस्ट घरोघरी जाऊन करण्याची जबाबदारीही आशांवर टाकली आहे. कोविडकाळातील कामाचा अतिरिक्त मोबदला द्या, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा स्वतंत्र मोबदला द्या, आशा व गटप्रवर्तकांना कायम नियुक्तीची पत्रे द्या, आशा व गटप्रवर्तक यांच्या नियमित वेतनात भरीव वाढ करा, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे.