सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे ही जागा मित्रपक्षाला न देता काँग्रेसकडेच राहावी, असे साकडे बुधवारी काँग्रेसचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांना घातले. नांदेड येथे चव्हाण यांची निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. दरम्यान, सांगलीच्या जागेबाबत येत्या दोन ते तीन दिवसात सकारात्मक निर्णय होईल. काँग्रेसचे स्थानिक नेते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी एकत्रित बसून हा प्रश्न निकाली काढतील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर समविचारी पक्षांनी एकत्रित येऊन भाजपविरोधात आघाडी केली आहे. या आघाडीत ‘स्वाभिमानी’च्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. त्यापैकी राष्ट्रवादीने हातकणंगले मतदारसंघ ‘स्वाभिमानी’ला दिला आहे, तर काँग्रेसकडून सांगली मतदारसंघ देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर वसंतदादाप्रेमींच्या मेळाव्यात त्यांचे नातू विशाल पाटील यांनी मैदानात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. खा. राजू शेट्टी यांनी, सांगलीची जागा देणार असाल तर वाद मिटवून द्या, अन्यथा शिर्डी मतदारसंघ चालेल, असा पवित्रा घेतला. त्यामुळे सांगलीच्या जागेचा पेच वाढत चालला आहे.
या पार्श्वभूमीवर बुधवारी सांगली महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांच्यासह २१ नगरसेवक व तीन जिल्हा परिषद सदस्यांनी थेट नांदेड गाठून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली. हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. गेल्या निवडणुकीचा अपवाद वगळता येथे काँग्रेसचाच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाला आहे. सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर पक्षांची आघाडी झाली आहे. ‘स्वाभिमानी’ला काँग्रेसने सांगलीची जागा देण्याचे ठरवले आहे. मात्र मित्रपक्षाला जागा न देता काँग्रेसने स्वत:कडेच मतदारसंघ ठेवावा. जिल्हा परिषद, महापालिकेत सत्ता नसली तरी, काँग्रेस सक्षमपणे विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे सांगलीची जागा मित्रपक्षाला सोडू नये, असे साकडे घालण्यात आले.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले की, कार्यकर्त्यांनी देशात काँग्रेसची सत्ता आणायची आहे, हे लक्षात घ्यावे. सांगलीची परिस्थिती मला माहिती आहे. ही जागा काँग्रेसने लढवावी की स्वाभिमानी शेतकरी संघटनेने, याचा निर्णय आता स्थानिक पातळीवर काँग्रेसचे नेते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी घेतील. त्यांच्यात लवकरच बैठक होईल. या बैठकीत समन्वयाने निर्णय घ्यावा. तशा सूचना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आ. सतेज पाटील यांना दिल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघात सकारात्मक निर्णय लवकरच होईल.यावेळी जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, नगरसेवक संतोष पाटील, उमेश पाटील, अभिजित भोसले, करण जामदार, करीम मेस्त्री, फिरोज पठाण, प्रकाश मुळके, वहिदा नायकवडी, शुभांगी साळुंखे, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, अमर निंबाळकर, संजय कांबळे, अय्याज नायकवडी आदी उपस्थित होते.