सांगली महापालिकेच्या विकासकामात भाजपाकडून जाणीवपूर्वक अडथळे : अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 04:52 PM2018-05-03T16:52:34+5:302018-05-03T16:52:34+5:30
सांगली महापालिकेत काँग्रेसची सत्ता असल्यामुळे, भाजपा सरकार कडून, सांगली महानगरपालिकेच्या विकास कामात जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात आहेत, सत्तेचा गैरवापर सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी सांगली येथे केला. दरम्यान, विश्वजित कदम यांची उमेदवारी निश्चितच असल्याचा पुनरुच्चार चव्हाण यांनी यावेळी केला.
सांगली : सांगली महापालिकेत काँग्रेसची सत्ता असल्यामुळे, भाजपा सरकार कडून, सांगली महानगरपालिकेच्या विकास कामात जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात आहेत, सत्तेचा गैरवापर सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी सांगली येथे केला. दरम्यान, विश्वजित कदम यांची उमेदवारी निश्चितच असल्याचा पुनरुच्चार चव्हाण यांनी यावेळी केला.
सांगली दौऱ्यावर आलेल्या अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळाल्याबद्दल जयंत पाटील यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, माझ्यात आणि त्यांच्यात संवाद राहिला पाहिजेल, आणि आम्ही तो संवाद कायम ठेवू अशा स्पष्ट करत त्यांनी भविष्यातील दोन्ही पक्षाच्या नव्या राजकीय समीकरणाचे सुतोवाच केले.
सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करायची का नाही या प्रश्नावर त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.
नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत सात गद्दार लोक आमचा पक्ष सोडून गेले होते, मात्र त्यांचा पराभव झाला, त्यामुळे इथल्या नेत्यांनी भाजपात जायचं का नाही त्याचा विचारपूर्वक निर्णय घावा, असा टोला अशोक चव्हाण यांनी हाणला.
विश्वजित कदम यांची उमेदवारी निश्चित
पलूस - कडेगाव पोटनिवडणूकीत विश्वजित कदम यांची उमेदवारी निश्चित आहे, मात्र उमेदवारीची अधिकृत घोषणा लवकरच करणार असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.
स्थानिक स्वराज संघासाठी उमेदवार जाहीर
स्थानिक स्वराज्य मतदार संघ निवडणुकीसाठी परभणी येथून सुरेश देशमुख, अमरावती येथून अनिल माधव गाडीया, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूरमधून इंद्रकुमार बालमुकुंद सराफ यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यावेळी उमेदवारी जाहीर केली.