प्रताप महाडीककडेगाव : कन्यारत्न झालं म्हणून वेगवेगळय़ा पद्धतीने आनंदोत्सव, स्वागत झाल्याचे आपण याआधीही पाहिले असेलच. असेच काहीसे हटके स्वागत सांगली जिल्ह्यातील हिंगणगाव खुर्द गावात करण्यात आले. सरपंच असलेल्या आजोबाने आपल्या नातीचे स्वागत चक्क हेलिकॉप्टरमधून आणून केले आहे. अशोक जाधव असं या सरपंच आजोबांचे नाव आहे. त्यांनी आपल्या एकुलत्या एक कन्या स्नेहा यांना कन्यारत्न झाल्याने आपल्या नातीला पुण्याहून हेलिकॉप्टरने आजोळी घरी आणलं आणि मुलगी जन्माचं स्वागत भव्य आणि अनोख्या पद्धतीने केले.शनिवारी दुपारी चारच्या सुमारास वांगी येथील क्रीडा संकुलाच्या मैदानात हेलिकॉप्टर उतरले आणि अशोक जाधव यांच्यासह जाधव कुटुंबीयांनी आपल्या नातीचे स्वागत व मुलगी जन्माचा आनंदही दिमाखदार पद्धतीनं साजरा केला. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, एकतरी मुलगा पाहिजे अशी मानसिकता असलेल्या समाजाला अशोक जाधव यांनी काही वर्षांपूर्वीच आदर्श घालून दिला आहे.अशोक जाधव यांना स्नेहा ही एकच मुलगी आहे. या मुलीचा विवाह २७ नोव्हेंबर २०२० रोजी कुंडल येथील स्वातंत्र सेनानी स्व.कॅप्टन रामचंद्र लाड यांचे नातू दिग्विजय लाड यांच्याशी झाला. स्नेहा आणि दिग्विजय यांना २९ मार्च २०२२ रोजी कन्यारत्न झाले. अशोक जाधव आणि त्यांच्या पत्नी उषा यांना नात झाल्याची बातमी कळताच आनंद झाला. आजी-आजोबांनी आपल्या नातीचे भव्य स्वागत करायचे ठरवले. त्याप्रमाणे आज नातीचं अर्थात मुलीच्या जन्माचं स्वागत इतक्या भव्यतेनं करण्यात आलं की गावात एकच चर्चा झाली.मुलीचा जन्म झाल्याचा आनंद अगदी हत्तीवरून साखर वाटून केल्याच्या घटनाही ऐकल्या आहेत; पण इथे मुलीला घरी आणण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर वापरलं आणि मुलगी जन्माचा आनंद साजरा केला. जिथे मुलगा झाल्याचा आनंद साजरा केला जातो, तिथे मुलगी झाली तर घरात निराशा येते. अशोक जाधव यांनी मात्र नातीच्या जन्माचा भव्य आनंद सोहळा साजरा करून समाजात नवा आदर्श निर्माण केला आहे.गावात स्वागत कमानीनातीच्या स्वागतासाठी गावातील रस्त्यांवर स्वागत कमानी उभारून फुलांची उधळण देखील केली होती. ज्यावेळी आई आणि मुलगी 'हेलिकॉप्टर'मधून उतरले त्यावेळी त्यांचे पुष्पहार आणि हार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी बँड आणि झांज पथकाच्या निनादात भव्य मिरवणूकही काढण्यात आली.यावेळी गावकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही मुलीचा जन्म उत्सव साजरा करत आहोत. हा जीवनाचा उत्सव आहे,” असे अशोक जाधव यांनी यावेळी सांगितले.
हिंगणगाव खुर्द येथे आजोबांनी केले नातीचे जंगी स्वागत, हेलिकॉप्टरमधून आणले चिमुकलीला घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 4:56 PM