सहदेव खोतपुनवत : कोकरूड (ता. शिराळा) येथील यशवंत माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, ग्रामीण कथाकार व वारणा कोतोलीचे सरपंच अशोक कुंभार यांनी गावातील प्रत्येक मुलीच्या लग्नात स्वखर्चाने दोन हजारांची कन्यादान साडी भेट देण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत त्यांनी पाच मुलींच्या लग्नात साड्या भेट दिल्या आहेत. त्यांच्या या समाजशील उपक्रमाचे कौतुक होत आहे.शिक्षक अशोक कुंभार यांची वारणा कोतोली (ता. शाहूवाडी) गावच्या सरपंचपदी ३० डिसेंबर २०२१ रोजी निवड झाली. त्यांना एक वर्षाचा कार्यकाल मिळाला असून, या अवधीत आदर्शवत काम करण्याचा निर्धार कुंभार यांनी केला आहे. त्यातीलच एक भाग म्हणून त्यांनी गावातील कोणत्याही मुलीच्या लग्नात स्वखर्चाने दोन हजार रुपयांची कन्यादान साडी लग्नात जाऊन भेट देण्याचा उपक्रम राबविला आहे. आतापर्यंत अनेक मुलींच्या लग्नगावी जाऊन ही अनोखी भेट दिली आहे.शिवाय गावातील आजी-माजी सैनिकांचा नामफलक ग्रामपंचायतीत लावून त्यांचा गौरव केला आहे. ग्रामपंचायत डिजिटल करणे, वेब कॅमेरा बसविणे, ज्येष्ठ नागरिकांचा यथोचित सन्मान करणे, ई-श्रमिक योजना राबविणे, स्मशानभूमी अद्यावत करणे तसेच व्यसनमुक्ती असे अनेक उपक्रम सरपंच अशोक कुंभार यांनी हाती घेतले आहेत. कुंभार यांच्या या वेगळ्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर करून गावाचा चेहरामोहरा बदलण्याचा माझा प्रयत्न राहील. ‘गाव माझा, मी गावचा’ ही संकल्पना प्रत्येकाच्या नसानसात रुजविण्याचे आटोकाट प्रयत्न करणार आहे. - अशोक कुंभार, सरपंच, वारणा कोतोली