आष्टा : अंकलखोप (ता. पलूस) तसेच आष्टा (ता. वाळवा) परिसरात गव्याचे दर्शन झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. अंकलखोप परिसरातील नागरिकांना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वर मंदिर, अंकलेश्वर मंदिरापासून झेंडा चौकातून गवा रेडा वावरताना दिसून आला. अमर शिसाळसह काही युवकांनी त्याला हुसकावून लावले. गवा चावडीमागील शेतात गेल्याची चर्चा आहे.
काही नागरिकांनी मोबाईलच्या सहाय्याने त्याचे चित्रीकरण केले. काही भागांतील सीसीटीव्ही फुटेजमध्येही तो दिसत आहे. परिसरात जंगली गव्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांतून भिती व्यक्त होत आहे. कृष्णा नदीकाठच्या ऊस पिकात संबंधित गवा लपून बसला आहे. सकाळी काही शेतकरी मोटार सुरु करण्यासाठी गेले असता त्यांना शेतात गवा पाहावयास मिळाला. काही शेतकऱ्यांच्या अंगावर धाव घेण्याचा गव्याने प्रयत्न केला आहे.
उसाच्या शेतात बस्तान
पेठ ते सांगली रस्त्यावर आष्टा पोलीस ठाण्यानजीक रस्त्याकडेलाच गव्याचे दर्शन झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. बुधवारी रात्री नऊच्या दरम्यान गवा दिसल्याची माहिती काही युवकांनी पोलिसांना दिली. गवा महिमान मळा ते सोमलिंग तलाव या ठिकाणी उसाच्या शेतात थांबला होता. त्याठिकाणाहून रात्री बाराच्या दरम्यान तो वाळवा रोडकडे गेला. वनाधिकारी सुरेश चरापले व पोलीस सोमलिंग येथे उपस्थित होते.
वनविभागाशी संपर्क करा
गवा दिसल्यास नागरिकांनी वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पलूसचे वनपरिमंडल अधिकारी मारुती ढेरे यांनी केले.