आष्टा : आष्टा पालिकेच्यावतीने शहरात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी दिली.
देशपातळीवर सुरू असणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ साठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. स्वच्छ सर्वेक्षणसाठी आष्टा शहरातील सर्व ठिकाणांची स्वच्छता करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आष्टा शहरातील बाजारपेठा, हॉटेल परिसर, रहिवासी ठिकाणे, पाण्याची ठिकाणे, मंदिर, मस्जिद परिसरात समन्वयक अभियंता प्रणव महाजन व सहकाऱ्यांच्यावतीने स्वच्छता सुरू आहे.
शहरात घरामध्ये, हॉटेलमध्ये निर्माण होणारा कचरा उघड्यावर टाकण्यास सक्त मनाई आहे. परंतु स्वच्छता झालेल्या ठिकाणी काही लोक परत कचरा टाकत आहेत. तरी जे नागरिक उघड्यावर कचरा टाकतील, त्यांच्यावर नगरपरिषदेमार्फत कडक दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. उघड्यावर कचरा फेकल्यामुळे शहराचे सौंदर्य लयास जात आहे. त्याचबरोबर रोगराई, डास यांचे प्रमाण वाढत आहे. तरी शहरातील सर्व नागरिकांनी आपल्याकडे असणारा ओला व सुका कचरा वेगळा करून घंटागाडीत टाकावा. तसेच घंटागाडी ज्या ठिकाणी पोहोचत नसेल, तेथील नागरिकांनी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी केले आहे.