फोटो ओळ : आष्टा पालिकेत अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांचा नगराध्यक्षा स्नेहा माळी, झुंजारराव पाटील, विशाल शिंदे, धैर्यशील शिंदे यांनी सत्कार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा नगरपरिषदेचा कोणतीही करवाढ नसलेला ४ लाख ८८ हजार २४१ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा स्नेहा माळी होत्या. मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, उपनगराध्यक्षा प्रतिभा पेटारे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
मागील शिलकेसह एकूण जमा ८६ कोटी ६६ लाख ४४१, सन २०२१-२२ चा खर्च ८६ कोटी ६१ लाख १२ हजार २०० वजा जाता ४ लाख ८८ हजार २४१ रुपये शिलकीचा कोणतीही करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
डॉ. कैलास चव्हाण म्हणाले, आष्टा पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी तीन कोटींची भरीव तरतूद केली आहे. शहरात सध्या चौसाल कर आकारणी सुरू आहे. घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये एकूण तीन कोटी ८० लाख, विविध करांपासून मिळणारे महसुली उत्पन्न ३ कोटी ४ लाख ९८ हजार, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या पुतळाकामासाठी एक कोटी १० लाखांची तरतूद केेली आहे.
वीर कुदळे म्हणाले, आष्टा शहरात घरकुल योजना राबविण्यात आली. मात्र काही तत्कालीन नगरसेवकांनी यातील काही घरकुले ५ लाखांच्या दरम्यान विकली. नागरिकांना राहण्यासाठी घरे नाहीत. या घरकुलांची चौकशी करण्यात यावी.
झुंजारराव पाटील म्हणाले, आष्टा पालिकेत कोणताही भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही.. घरकुलाबाबत अनियमितता झाली असल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. पदाधिकारी कोणालाही पाठीशी घालणार नाहीत.
यावेळी धैर्यशील शिंदे, विशाल शिंदे, अर्जुन माने, विजय मोरे, विकास बोरकर, पी. एल. घस्ते, संगीता सूर्यवंशी, मनीषा जाधव, पुष्पलता माळी, रुक्मिणी अवघडे, शारदा खोत, शेरनवाब देवळे, सारिका मदने, तेजश्री बोंडे, जगन्नाथ बसुगडे उपस्थित होते.
चौकट
कारवाईची मागणी
अर्जुन माने म्हणाले, नागाव रस्त्यावर तसेच विविध ठिकाणी काही विक्रेते कोंबड्यांची पिसे व इतर साहित्य टाकून देत असतात त्यांच्यावर कारवाई करावी. या मार्गावर फलक लावण्यात यावेत.