आष्टा : आष्टा पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी स्वतः दुचाकीवरून फिरून विनामास्क फिरणाऱ्यांसह व्यावसायिकांवर कारवाई केली. मुख्याधिकारी ‘ॲक्शन मोड’वर असल्याचे चित्र आहे.
आष्टा शहरात कोरोना रुग्णांची संख्या ४५० वर गेल्याने मुख्याधिकारी चव्हाण सतर्क झाले आहेत. त्यांनी आष्ट्यात मोटारसायकल घेऊन मिरज वेस, कदम वेस, घोरपडे गल्ली, शिंदे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली. तसेच लॉकडाऊनच्या काळातही व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या व्यावसायिकावर दंडात्मक कारवाई केली.
मुख्याधिकाऱ्यांसोबत पालिकेचे अधिकारी आर. एन. कांबळे, आनंदा कांबळे, आसावरी सुतार, विशाल घस्ते, संकेत घोरपडे, संतोष खराडे यांनी कारवाई केली.
शहरात मुख्याधिकारी स्वतः गाडीवर फिरून कारवाई करीत असल्याचे चित्र दिसत आहे.
चौकट
मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण स्वतः डॉक्टर आहेत. त्यांनी शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी व शहरातून कोरोनाला हद्दपार करावे, अशी नागरिकांतून अपेक्षा व्यक्त होत आहे.
फोटो : आष्टा पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी दुचाकीवरून फिरून शहरातील व्यावसायिकांवर व विनामास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली.