सांगली : मासेमारीच्या गळामध्ये फसलेल्या एशियाटिक सॉफ्ट सेल प्रजातीच्या कासवाला प्राणीमित्रांनी जीवदान दिले. त्याला भूल देऊन गळ काढला व पुन्हा नदीमध्ये सोडले.
सांगलीवाडीमध्ये रविवारी (दि. ६) दुपारी दत्तात्रय कोळी यांना हे कासव जखमी अवस्थेत आढळले होते. प्रमोद जगताप त्याच्या तोंडात मासेमारीचा गळ अडकला होता.जबड्यातून आरपार झाल्याने कासवाची हालचाल मंदावली होती. जखमी अवस्थेतच हालचाल सुरु होती. गळ हाताने सहज काढणे शक्य नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे कोळी व प्राणीमित्र प्रमोद जगताप यांनी ॲनिमल राहतचे कार्यकर्ते कौस्तुभ पोळ व डॉ. विनायक सूर्यवंशी यांना माहिती दिली.
कासवाची नाजुक अवस्था पाहता त्याला बेशुद्ध करून गळ काढण्याचे ठरले. तत्पूर्वी वन विभागालाही कळविण्यात आले. कासवाला भूल देण्यात आली. ते बेशुद्ध झाल्यावर धातूचा गळ हळूहळू काढण्यात आला. जखमेवर औषधोपचार केले. भूल उतरल्यावर काहीवेळ विश्रांती दिली. त्यानंतर पुन्हा कृष्णा नदीच्या पात्रात मुक्त केले. याकामी डॉ. विनायक सूर्यवंशी, डॉ. अजय बाबर, सागर भानुसे, कौस्तुभ पोळ यांनी परिश्रम घेतले. प्राणीमित्रांच्या सतर्कतेने कासवाचे प्राण वाचले.