सांगली : सामाजिक कार्यकर्ते आसिफ बावा यांच्यावर केलेल्या कारवाईची निःपक्षपाती चौकशी करावी, अशी मागणी मंगळवारी गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
समितीचे चंदन चव्हाण म्हणाले की, आसिफ बावा यांनी सामाजिक एकोप्यासाठी कार्य केले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीही त्यांनी पोलिसांना नेहमीच मदत केली आहे. पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्रास होईल असे कृत्य केलेले नाही. त्यांची पार्श्वभूमीही गुन्हेगारी प्रवृत्तीची नाही. तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने जनतेत भीतीचे वातावरण आहे. कोरोनासारख्या महामारीत प्रशासन चांगले काम करत असताना, पोलिसांच्या कार्यशैलीबद्दल जनतेच्या मनात संशय निर्माण होत आहे. पोलीस व सामाजिक कार्यकर्ते यांच्यात वाद निर्माण होऊ नये, यासाठी घडलेल्या या घटनेची निःपक्षपाती चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी महिला जिल्हाध्यक्षा उषामाई गायकवाड, भगवानदास केंगार, बाबासाहेब सपकाळ, विजय बल्लारी, सागर डुबल, प्रदीप जाधव, प्रशांत सदामते, हेमंत मोहिते उपस्थित होते.