सांगली : बेकायदेशीरपणे जमाव जमवून पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असिफ बावा याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळला. जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर बावाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे आता बावा याच्यावर अटकेची कारवाई होणार आहे.
शहरातील खणभाग परिसरात दोघांमध्ये सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी महिला पोलीस मध्यस्थी करत असताना, संशयित बावा हा तिथे आला. त्याने चाळीस ते पन्नास जणांचा बेकायदेशीरपणे जमाव जमवून अरेरावी केली होती. यावेळी जमावातील एकाने महिला पोलिसाला धक्काबुक्की केली होती. त्यानंतर प्रकरणाची गंभीर दखल घेत या गुन्ह्यातील संशयितांना पकडण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते, तर बावा याच्यावर बेकायदेशीरपणे जमाव जमविणे यासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. स्वत: कोरोना पॉझिटिव्ह असतानाही कोविड सेंटरपर्यंत चालत गेल्याबद्दल बावा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर बावा याचा जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. बुधवारी उच्च न्यायालयानेही जामीन अर्ज फेटाळल्याने आता शहर पोलिसांकडून त्याला अटक करण्यात येणार आहे.