सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आठ दिवसांचा कालावधी आहे. सत्ताधारी भाजपसह काँग्रेस व राष्ट्रवादीतील इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. येत्या रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सांगलीत आहेत. यावेळी नगरसेवकांची मते आजमावली जाण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस उमेदवाराचा फैसला जयश्रीताई पाटील यांच्या हाती आहे.
महापालिकेच्या नव्या महापौर, उपमहापौरांची २३ रोजी निवड होणार आहे. त्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. सत्ताधारी भाजपमध्ये महापौरपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. निरंजन आवटी, धीरज सूर्यवंशी, युवराज बावडेकर, स्वाती शिंदे यांच्यासह विद्यमान महापौर गीता सुतार यांनीही दावा केला आहे तर काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, मंगेश चव्हाण तर राष्ट्रवादीतून गटनेते मैनुद्दीन बागवान, विष्णू माने, दिग्विजय सूर्यवंशी यांनी निवडणूक लढविण्याची तयारी चालविली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीत अजूनही महापौर, उपमहापौरपदाची उमेदवारीवरून धुसफूस सुरू आहे. राष्ट्रवादीने महापौरपदावर दावा केल्याने काँग्रेसचे नगरसेवक नाराज आहेत.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे रविवारी सांगलीत आहेत. जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाबाबत चर्चा होणार असल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे. त्याला जोडून महापौरपदाबाबतही इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपच्या इच्छुकांनी पक्षाचे खासदार, आमदारांसह कोअर कमिटीच्या सदस्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. पक्षाच्या कार्यक्रमाला नगरसेवकांची हजेरी वाढली आहे, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही रविवारी जिल्ह्यात येणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
चौकट
मुंबईतील बैठक रद्द
कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत गुरुवारी काँग्रेस नगरसेवकांची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. पण ही बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आली. बैठकीपूर्वी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याशी चर्चा होणार होती. पण पाटील हे सध्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत आहेत. ते जिल्ह्यात आल्यानंतरच दोन्ही काँग्रेस नेत्यांची एकत्रित बैठक होण्याची शक्यता आहे.