ंंअशोक पाटील ल्ल इस्लामपूर १९८0 नंतरच्या नियोजित विकास आराखड्याला अंतिम मुहूर्त लागणार नाही. त्यामुळे हजारो बाधित मालमत्ताधारक चिंतेत आहेत. त्यातच सत्ताधारी राष्ट्रवादीने स्वबळावर आराखडा मंजूर केला आहे. यावर भाजप युवा मोर्चाचे विक्रमभाऊ पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे आराखडा रद्दची तक्रार दाखल केली आहे. यावर सोमवारी, २१ आॅगस्ट रोजी निकाल दिला जाणार आहे. तसेच ए. पी. ९६ बाधित मालमत्ता धारकांनी पुणे आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यास सुरुवात केली आहे. विकास आराखड्यात गोलमाल असून शहरातील सर्वसामान्य मालमत्ता धारकांची अवस्था आगीतून फुपाट्यात पडल्यासारखी झाली आहे. सर्वसामान्य जनतेला आपल्या हक्काचे कायदेशीर घर असावे, म्हणून नागरिक इस्लामपूर पालिकेत आणि महसूल विभागात हेलपाटे मारुन बेजार झाले आहेत, तर सत्ताधाऱ्यांतील काही नेत्यांनी स्वत:च्या मालमत्ता वाचविण्यासाठी अधिकाऱ्यांच्या हातावर वजन ठेवून आपले हात वर केले आहेत. काही नेत्यांनी तर आरक्षणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचे भूखंड हडप केले आहेत. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नेत्यांकडून सर्वसामान्य बाधित मालमत्ता धारकांना न्याय देण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या सुचविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. नियोजित विकास आराखड्यावर पालिकेने लाखो रुपये खर्ची टाकले आहेत. राष्ट्रवादीने सभागृहात विकास आराखड्याला मंजुरी देऊन तो अंतिम मंजुरीसाठी शासनदरबारी पाठवला होता. परंतु हा आराखडा अन्यायी असल्याने खासदार राजू शेट्टी, भाजपचे विक्रमभाऊ पाटील, काँग्रेसचे वैभव पवार आणि विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, हा आराखडा रद्द करावा अशी मागणी वेळोवेळी केली आहे. याची दखलही राष्ट्रवादीने घेतली नाही. आराखड्याच्या निर्णयाला शासनाकडून विलंब होत असल्याचे पाहून पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी २२ जून २0१६ रोजी बहुमताच्या जोरावर हा विकास आराखडा मंजूर केला आहे. त्यानंतर या आराखड्यात बाधित असलेल्या ९६ मालमत्ता धारकांना पुणे येथील आयुक्तांकडे अपील दाखल करण्यास नगरविकास खात्याने सांगितले आहे. त्यामुळे शहरातील हे मालमत्ताधारक आपल्या नेत्यांना गाठून पुण्याच्या वाऱ्या करु लागले आहेत. हा विकास आराखडा रद्द व्हावा म्हणून भाजयुमोचे विक्रमभाऊ पाटील यांनी कोणताही गाजावाजा न करता जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीवर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी रविवारची सुट्टी असतानाही पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना कामावर बोलावल्याचे समजते. याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे. बहुमताच्या जोरावर विकास आराखडा मंजूर केला नगरपालिकेने सादर केलेल्या आराखड्यास विलंब होत असल्याचे पाहून पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर हा विकास आराखडा मंजूर केला आहे. त्यानंतर या आराखड्यात बाधित मालमत्ता धारकांना पुणे आयुक्तांकडे अपील दाखल केले.
मालमत्ताधारक आगीतून फुपाट्यात
By admin | Published: August 21, 2016 11:52 PM