सांगली : खंडणीच्या गुन्ह्यातील साक्षीदार गोरखनाथ ऊर्फ मनोज माने याचा खून करणाऱ्या गुंड म्हमद्या नदाफ यास हत्यारे पुरविणाऱ्यास नीलेश बाळू सरगर (वय २०, संजयनगर, सांगली) यास शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या म्हमद्याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने शनिवारी सहा दिवसांची वाढ केली आहे. आर्थिक वाद व खंडणीचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने म्हमद्या नदाफ व त्याच्या साथीदारांनी मनोज माने याचा धारदार शस्त्रांनी हल्ला करुन निर्घृण खून केला होता. या खूनप्रकरणी म्हमद्यासह त्याचे साथीदार सागर शेंडगे, कमर मुजावर, सोहेल शेख यांना अटक केली आहे. तसेच म्हद्याला पळून जाण्यासाठी मदत करणे, आर्थिक रसद पुरविणे व जेवणाचे डबे पुरविणाऱ्या बाराजणांना अटक केली आहे. सध्या सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची रवानगी कोल्हापुरातील कळंबा कारागृहात करण्यात आली आहे. खुनानंतर म्हमद्या तब्बल एक महिना फरारी होता. बेडकीहाळ (ता. चिकोडी) येथे त्याला अटक करण्यात यश आले होते. प्रथम त्यास खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात खुनाच्या गुन्ह्यात अटक केली. त्याच्या पोलीस कोठडीची शनिवारी मुदत संपल्याने दुपारी न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने ३१ डिसेंबरपर्यंत त्याच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. म्हमद्याने धारदार शस्त्रांनी हल्ला करुन मनोजचा खून केला होता. त्याच्या चेहऱ्यावर डोक्यात मोठ्या प्रमाणात वार होते. यातून रक्तस्त्राव झाल्याने मनोजचा जागीच मृत्यू होता. म्हमद्याला हत्यारांची गरज होती. ही बाब त्याने नीलेश सरगर व शहाबाज मुजावर या दोघांना बोलून दाखविली होती. त्यांनी तातडीने हत्यारांची जुळवाजुळव करुन ती म्हमद्याकडे दिली होती. म्हमद्याने ही हत्यारे स्वत:च्या घरी ठेवली होती. संधी मिळेल, त्यादिवशी मनोजची ‘गेम’ करण्याचे ठरविले होते. खून केल्यानंतर म्हमद्याने हत्यार तिथेच टाकून पलायन केले होते. यापूर्वीच हत्यारे जप्त केली आहेत. म्हमद्याच्या चौकशीतून हत्यारे पुरविणाऱ्या नीलेश सरगर व शहाबाज मुजावर यांनी नावे निष्पन्न झाली. पण मुजावरला यापूर्वीच अटक केली आहे. केवळ सरगर राहिला होता. त्यालाही शनिवारी रात्री अटक केली. दुपारी त्याला न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची पोलिस कसून चौकशी करित आहेत. (प्रतिनिधी)
हत्यारे पुरविणारा साथीदार जेरबंद
By admin | Published: December 27, 2015 12:09 AM