लोकमत न्यूज नेटवर्क कवठेमहांकाळ : गुन्ह्याच्या तपासकामात सहकार्य करतो म्हणून पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदार व पोलीस नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी जाळ्यात पकडले. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दुपारी एक वाजता ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस फौजदार चंद्रकांत आण्णाप्पा किल्लेदार (वय ५४, रा. जयश्री टॉवर, माळी थिएटरसमोर, चांदणी चौक, सांगली) व पोलीस नाईक बाळासाहेब नाथा मगदूम (३७, रा. लिंगनूर, ता. मिरज) अशी कारवाई करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, किल्लेदार व मगदूम या दोघांनी एका गुन्ह्यात संशयितास तपासकामात सहकार्य करतो म्हणून भ्रमणध्वनीवरून पाच हजारांची लाच मागितली होती. याचे कॉल रेकॉर्डिंग संबंधित तक्रारदाराने केले होते व याबाबतची तक्रार सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. या तक्रारीनुसार विभागाने गुरुवारी (दि. १ जून) या रेकॉर्डिंगची पडताळणी केली. यामध्ये किल्लेदार व मगदूम यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मंगळवारी (दि. २०) याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कवठेमहांकाळ पोलिसांत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक परशराम पाटील, निरीक्षक सुनील गिड्डे, सुनील कदम, जितेंद्र काळे, सचिन कुंभार, सुनील राऊत, भास्कर भोरे, बाळू पवार यांनी या कारवाईत भाग घेतला. या अटकेमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सहायक फौजदारासह पोलिसाला अटक
By admin | Published: June 21, 2017 12:48 AM