गडहिंग्लज : तुतारी, लेझीम, ढोल-ताशा, झांजपथकाचा गजर आणि जय भवानी...जय शिवाजीच्या गगनभेदी घोषणांनी अवघी गडहिंग्लजनगरी शिवमय झाली होती. तब्बल तीन तास चाललेल्या या मिरवणुकीत मुस्लिम बांधवदेखील आवर्जून सहभागी झाले होते. महाराष्ट्र दिन आणि शिवजयंतीच्या औचित्यावर काढण्यात आलेली छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक अभूतपूर्व व ऐतिहासिकच ठरली.छत्रपती शिवाजी मराठा मंडळ व पुतळा प्रतिष्ठानतर्फे शहरातील दसरा चौकात बसविण्यात येणारा १५ फूट उंचीचा हा पुतळा शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला म. दु. श्रेष्ठी विद्यालयाच्या प्रांगणात आणण्यात आला. खास रायगडावरून आणलेल्या जलकुंभांनी पुतळ्याला अभिषेक घालण्यात आला. कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन झाले. त्यानंतर मिरवणुकीस सुरुवात झाली.वीरशैव बँक, नेहरू चौक, शिवाजी चौक, लक्ष्मी रोड, आयलँड, मुसळे कॉर्नर, एम. आर. हायस्कूल, आझाद रोड, शिवाजी बँक मार्गे दसरा चौकात आल्यानंतर पुतळ्याच्या चबुतर्याजवळ मिरवणुकीची सांगता झाली. ठिकठिकाणी पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.मिरवणुकीत सभापती अमर चव्हाण, नगराध्यक्षा मंजूषा कदम, उपनगराध्यक्षा सुंदराबाई बिलावर, विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी, राष्ट्रवादीचे गटनेते रामदास कुराडे, मराठा मंडळ व पुतळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण कदम, विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा रत्नमाला घाळी, माजी आमदार संजय घाटगे, जि. प. सदस्य अप्पी पाटील, भिकाजीराव मोहिते, दत्ताजीराव बरगे, राजेंद्र गड्ड्यान्नावर, दिलीप माने, सुरेश कोळकी, वसंत यमगेकर, ॲड. अर्जुन रेडेकर, युवराज पाटील, प्रकाश तेलवेकर, प्रा. शिवाजीराव भुकेले, प्रा. यशवंत कोले, मुख्याधिकारी राजेंद्र तेली, आदींसह नगरसेवक, विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह शिवप्रेमी, अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांचा सहभाग लक्षणीय होता. पावसाच्या व्यत्ययानंतरही शिवप्रेमींचा उत्साह कायम होता. (प्रतिनिधी)
अश्वारूढ शिवपुतळ्याची गडहिंग्लजला जंगी मिरवणूक
By admin | Published: May 03, 2014 1:23 PM