विटा : लोकसभा निवडणुकीत जे घडले त्यावर आता भाष्य करणार नाही; परंतु यापुढची पाच वर्षे जिल्ह्यात शिवसेना बांधणीवर लक्ष केंद्रित करणार आहे. त्यानंतरच पुढची लढाई लढणार आहे. त्यामुळे आताची विधानसभा निवडणूक लढविणार नाही, अशी भूमिका शिवसेना (उबाठा) गटाचे नेते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी गुरुवारी स्पष्ट केली.खानापूर विधानसभा निवडणूक चंद्रहार पाटील हे उद्धवसेनेतून लढविणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू होती. दिल्लीतही वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत याबाबत महाविकास आघाडीतून त्यांच्याच नावाची चर्चा झाली होती. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत उत्सुकता असताना चंद्रहार पाटील यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.चंद्रहार पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत जे घडले तो इतिहास आहे. हा इतिहास मागे सोडून पुढे चाला, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला दिला आहे. नवी दिल्लीत खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी माझीही त्यांच्याशी चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकजुटीने, ताकदीने लढण्याचा आणि वाद मागे ठेवून पुढे जाण्याचा निर्णय या बैठकीत झाला.सांगली जिल्ह्यातील आठपैकी खानापूर व मिरज या मतदारसंघांबाबत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीत खुली चर्चा झाली. या दोन्ही जागा शिवसेना लढेल आणि खानापुरातून चंद्रहार पाटील लढतील, अशी दिल्लीत चर्चा रंगली होती.
मैदान कुठले असेल, तेही उद्धव ठाकरेच ठरवतील!सांगली जिल्ह्यात शिवसेनेची मजबूत बांधणी करायची आहे. त्यासाठी पुढची पाच वर्षे मी सचोटीने काम करणार आहे. शिवसेनेसोबत तरुणांची, महिलांची, कष्टकऱ्यांची फळी उभी करायची आहे. शिवसेना हा न्याय देणारा पक्ष आहे. हा विचार या मातीत रुजवायचा आहे. त्यानंतर मग मी पुन्हा लढेन. त्यावेळी मैदान कुठले असेल, याचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील; पण आताची विधानसभा निवडणूक लढविणार नाही.