लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यात अटल भूजल योजनेच्या चित्ररथ संचलनास प्रारंभ करण्यात आला. राज्यातील १३ जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील भूजलपातळीत सातत्याने घट होत असलेल्या खानापूर, कवठे महांकाळ, जत, तासगाव या तालुक्यातील ९२ गावांचा समावेश आहे.
भूजल विभागाचे राज्य संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या प्रेरणेतून राज्यभर चित्ररथाचे संचलन करण्यात येत आहे. शनिवारी जिल्ह्यात या चित्ररथाचे आगमन झाले. रविवारी विटा येथे आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते चित्ररथास प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी संतोष भोर, सभापती महावीर शिंदे, तहसीलदार ऋषिकेत शेळके, यांत्रिकी अभियंता निलेश जाधव, आवेदक फाकटकर उपस्थित होते. लोकसहभागातून गावांचा जलसुरक्षा आराखडा बनविणे, जलसंधारासाठी व पाणीबचतीच्या उपाययोजनांची कामे हाती घेणे, आणि गावांमध्ये जलपरिपूर्णतेसाठी लोकसहभागातून ठोस व्यवस्था निर्माण करणे ही योजनेची उद्दिष्ट्ये आहेत.