आष्टा : आष्टा पालिकेतील सत्ताधारी गटाने ३५ महत्त्वाच्या विषयांवर होणारी सर्वसाधारण सभा हुकूमशाही पद्धतीने केवळ पाच मिनिटांत गुंडाळली. जनतेच्या प्रश्नांची चेष्टा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना परमेश्वराने सुबुद्धी द्यावी म्हणून विरोधी शिवसेनेचे पक्षनेते वीर कुदळे यांच्यासह विरोधी लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी ‘आत्मक्लेश भजन’ आंदोलन केले.
आष्टा पालिकेची मंगळवार, दि. १५ डिसेंबर रोजी सर्वसाधारण सभा झाली. सुरुवातीला ही सभा ऑनलाईन होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ऑफलाईन घेण्यात आली. मात्र या सभेत सत्ताधारी गटाने कोणतीही चर्चा न करता सर्व ३५ विषय हुकूमशाही पद्धतीने मंजूर केले. याबाबत वीर कुदळे, वर्षा अवघडे व सत्ताधारी गटाचे अर्जुन माने यांनी तीव्र निषेध केला.
मंगळवारी झालेल्या आत्मक्लेष भजन आंदोलनात वीर कुदळे म्हणाले. सत्ताधाऱ्यांना आष्टा शहरातील जनताच उत्तर देईल. नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित असताना, सत्ताधाऱ्यांनी केलेली कृती निंदनीय आहे. यावेळी दिलीप कुरणे, नंदकुमार आटुगडे, राकेश आटुगडे, आष्टा शहर लोकशाही आघाडीचे अध्यक्ष अमोल पडळकर, वर्षा अवघडे, गणेश माळी, स्वप्निल माने, अर्चना माळी यांच्यासह विरोधी गटाचे कार्यकर्ते उपस्थित हाेते. भजन आंदोलन केल्यानंतर मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
फोटो : २२ आष्टा १
ओळ : आष्टा पालिकेसमोर मंगळवारी विरोधी पक्षनेते वीर कुदळे, वर्षा अवघडे, अमोल पडळकर, राकेश आटुगडे, नंदकिशोर आटुगडे, अर्चना माळी, गणेश माळी, स्वप्निल माने यांनी ‘आत्मक्लेश भजन’ आंदोलन केले.