शिवाजी पाटील -- येळापूर--दुष्काळ आणि वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या श्रेयावरून शिराळा तालुक्यातील वातावरण पेटले आहे. प्रत्येकाकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून, याचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना किती फायदा-तोटा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भाजप-सेना युती सरकार सत्तेवर येऊन एक वर्षाचा कार्यकाल लोटला आहे. आघाडी सरकार उलथवणाऱ्या मतदारांना या सरकारकडून विशेष अपेक्षा आहेत. यात शेतकरी, उद्योजक, सुशिक्षित बेरोजगार, महिला यांचा समावेश आहे.युती सरकारने नुकतेच राज्यातील अनेक जिल्हे, तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले. यात शिराळा तालुक्याचा समावेश नसल्याने संपूर्ण तालुक्यात नाराजी पसरली होती. शिराळा तालुका हा भरपूर पाऊस पडणारा तालुका म्हणून परिचित आहे. परंतु यावर्षी पावसाने दडी मारल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. खरीप हंगामातील पिके वाया गेलीच आहेत, आता रब्बी हंगाम घ्यायचा का नाही, या विचारात शेतकरी आहेत. यामुळे शिराळा तालुक्यातील नेत्यांनी दुष्काळाचा मुद्दा उचलून याचे राजकारण केले.माजी आमदार मानसिंगराव नाईक व जि. प.चे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी मोर्चे, आंदोलनाबरोबरच शासनाला निवेदन दिले; तर भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी, युती सरकारला प्रशासनाने चुकीचा अहवाल दिल्यामुळे शिराळा तालुका दुष्काळग्रस्त यादीत आला नसल्याचे दाखवून दिले व सर्व गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.वारणा धरणात यावर्षी पाण्याचा साठा कमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी, ऊस लागण करू नका, असे आदेश दिले आहेत. शिराळा तालुक्यातील बहुतांशी पाझर तलावांतील पाण्याची पातळी संपुष्टात आली असून, मोरणा, टाकवे, वारणा धरणातील पाणीसाठा कमी होत चालला आहे.गेल्या वर्षापासून वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या निधीवर आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, याच योजनेचे पाणी लवकर सोडावे, यासाठी सध्या सभा, पत्रकार बैठकांतून आरोप होऊ लागले आहेत. तालुक्यातील तीनही नेते एकमेकांवर टीका-टिपणी करू लागले आहेत. यामुळे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.आघाडी सरकारच्या विरोधात निवडून आलेल्या युती सरकारला पळताभुई करून सोडण्यासाठी दोन्ही काँग्रेस पक्ष कामाला लागले आहेत; तर सरकारची बाजू सांभाळत सर्वांना न्याय देण्यासाठी भाजप प्रयत्न करत असून, याला यश कधी मिळणार? दुष्काळाच्या सवलती मिळणार की नाहीत? वाकुर्डे योजनेचा प्रश्न कधी मार्गी लागणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.पाण्याची बचत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहनवारणा धरणात यावर्षी पाण्याचा साठा कमी असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी ऊस लागण करू नये, असे आदेश काढले आहेत.शिराळा तालुक्यातील बहुतांशी पाझर तलावांतील पाण्याची पातळी संपुष्टात आली असून, मोरणा, टाकवे, वारणा धरणातील पाणीसाठा कमी होत चालला आहे.
‘वाकुर्डे बुद्रुक ’ श्रेयवादावरून वातावरण पेटले
By admin | Published: November 19, 2015 11:47 PM