अविनाश बाड। लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्यांमुळे आटपाडी पंचायत समितीचा शिक्षण विभाग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बदली झालेल्या २० शिक्षकांना सोडले, मात्र आणखी ४९ शिक्षकांना न सोडल्याने ५ ते १० हजार रुपये असा प्रत्येक शिक्षकामागे बदलीचा दर सुरू झाला आहे, अशी चर्चा पंचायत समितीच्या आवारात शिक्षकांमध्ये दबक्या आवाजात सुरु आहे.दि. ५ जुलै रोजी आंतरजिल्हा बदलीचे आदेश जिल्हा परिषदेतून देण्यात आले. या आदेशामुळे आप-आपल्या जिल्ह्यात किंवा सोयीच्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी इच्छुक शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मात्र आटपाडी पंचायत समितीमधून शिक्षकांना सोडण्यास नकार दिल्याने शिक्षकांची मोठी पंचाईत झाली आहे. लवकर तिथे हजर झाले नाही, तर तिथे हवी ती शाळा मिळण्यासाठी मोठा खर्च करावा लागेल, असे काहींनी सांगितले. बदलीचा आदेश झालेले शिक्षक-शिक्षिका शाळेत न जाता थेट पंचायत समितीच्या कार्यालयात हेलपाटे मारीत आहेत. त्यात आता शिक्षक संघटना आणि त्यांचे नेते आघाडीवर आहेत.आटपाडी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १९० शाळा आहेत. ४७५ शिक्षक कार्यरत आहेत. या बदल्यांपूर्वी एकूण ४९ मुख्याध्यापकांसह शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. ३७ उपशिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. आता बदलून गेलेले आणि जाणारे अशी एकूण ८६ उपशिक्षकांची पदे रिक्त होणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक शाळा शिक्षकांविना ओस पडण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या सिध्दनाथनगर (गोमेवाडी), घनचक्रीमळा (दिघंची) आणि काळामळा (राजेवाडी) या तीन प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकच नाहीत. तालुक्यात बाहेरुन इथे येण्यास शिक्षक इच्छुक नसतात. त्यामुळे जि. प. च्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.शनिवारी दिवसभर पंचायत समितीच्या आवारात बदली झालेली शिक्षक आणि शिक्षक संघटनांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी गर्दी केली होती. बदली झालेल्या शिक्षिका मात्र रडकुंडीस आल्या होत्या.अशा परिस्थितीत सध्या अहमदनगर जिल्ह्यासाठी-१०, सोलापूर-२, बीड-१, नाशिक-१, नांदेड-१, वाशिम-१, उस्मानाबाद-४ आणि सातारा जिल्ह्यातील ४ शिक्षकांना सोडले आहे. त्यामुळे रिक्त पदांच्या ठिकाणी शिक्षक आले नाहीत, तर तालुक्यातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार, ही वस्तुस्थिती आहे.पुरव्याशिवाय खोटे आरोप : मोरे याबाबत आटपाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे म्हणाले की, आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना टप्प्याटप्प्याने सोडायचे, हा सभागृहाचा निर्णय आहे. त्यानुसार रितसर प्रक्रिया सुरु आहे. माझ्या कार्यालयाकडून कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही. पुराव्याशिवाय खोटे आरोप करणाऱ्यांना काय म्हणणार?
आटपाडीचा शिक्षण विभाग वादात
By admin | Published: July 15, 2017 11:54 PM