आटपाडी : बहुचर्चित आटपाडी ग्रामपंचायतीची अखेर नगरपंचायत झाली आहे. तब्बल आठ वर्षांच्या अनेक संघर्षमय घडामोडीनंतर याबाबतचा निर्णय झाला. विद्यमान सरपंचांचा विरोध असतानाही नगरपंचायतीबाबत अधिसूचना निघाली आहे.महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने याबाबत २० मे रोजीच्या शासन निर्णयानुसार आटपाडी येथे नगरपंचायत स्थापन करण्याबाबत ही अधिसूचना जाहीर केली आहे. नगरपंचायत हद्दीमध्ये आटपाडीसह मापटेमळा व भिंगेवाडी या गावांचाही समावेश करण्यात आला आहे.आटपाडी ग्रामपंचायतीत असलेले गावचे गट नंबर १ ते ३२८० व ३४०३ ते ४२१८, मापटेमळा ग्रामपंचायतीतील असलेले गट नं. १ ते ६०४, भिंगेवाडी ग्रामपंचायतीत असलेले गट नंबर १ ते १५५ हे आटपाडी नगरपंचायतीचे संक्रमणात्मक स्थानिक क्षेत्र असणार आहे.
या संक्रमणात्मक क्षेत्रातील स्थानिक क्षेत्राच्या पूर्वेच्या हद्दीस बोंबेवाडी, खांजोडवाडी, यमाजी पाटलाची वाडी गावची हद्द, पश्चिमेस मुढेवाडी, बनपुरी या गावची हद्द व शेंडगेवाडी वस्ती, आटपाडी गट नंबर ३२८१ ते ३४०२, दक्षिणेस तडवळे, मासाळवाडी, बनपुरी गावची हद्द व उत्तरेस गळवेवाडी, पिसेवाडी, आवळाई, शेरेवाडी, पुजारवाडी (आटपाडी), देशमुखवाडी गावची हद्द असा हद्दीचा तपशील आहे.